| सांगली समाचार वृत्त |
जत - मंगळवार दि. २९ जुलै २०२५
कर्नाटक सीमेलगत असलेल्या जत तालुक्याच्या बहुआयामी विकासासाठी शासन सज्ज झाले असून, स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा त्याचा प्रमुख टप्पा ठरणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान’अंतर्गत जत शहरातील महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, तहसीलदार प्रवीण धानोरकर, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड आणि पै. भीमराव माने यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील यांनी जतच्या विकासाच्या दृष्टीने ही योजना टर्निंग पॉईंट ठरणार असल्याचे सांगितले. नगरोत्थान योजनेअंतर्गत ७७ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या योजनेंतर्गत शहरातील प्रत्येक कुटुंबाला दररोज स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल, अशी खात्री त्यांनी दिली. यासोबतच, पाण्याचा समतोल वापर करण्याचं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं.आमदार सदाभाऊ खोत यांनी जतसाठी सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा उल्लेख करताना सांगितले की, पिण्याचे व शेतीसाठी पाणी, रस्ते व अन्य पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे जुने प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतसाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याची माहिती देताना सांगितले की, या आराखड्यानुसार टप्प्याटप्प्याने शहराचा कायापालट होईल. रस्ते, आरोग्य सेवा, बालविकास केंद्रे, जिल्हा परिषद शाळा, नवीन इमारती, सांडपाणी व्यवस्थापन तसेच पर्यटनसाठी उद्याने व वॉटर पार्कच्या उभारणीसाठी प्रस्ताव दिले आहेत. याशिवाय, जतला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयही मंजूर झाले आहे.
या योजनेंतर्गत जत शहरात १९० किलोमीटर जलवाहिनी, चार नव्या जलसाठा टाक्या (2.50 लाख, 5.25 लाख, 10.10 लाख व 0.40 लाख लिटर क्षमता), नवीन जलशुद्धीकरण केंद्र, तसेच १८ जलपंपांची बसवणूक करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन झाले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.