| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - मंगळवार दि. २९ जुलै २०२५
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरजवळच्या दाचिगाम परिसरात भारतीय सुरक्षा दलांनी 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत तीन दहशतवाद्यांचा खातमा केला आहे. दाट लोकवस्तीच्या या संवेदनशील भागात ऑपरेशन राबवणं मोठं आव्हान होतं, तरीही लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी समन्वय साधत ही कारवाई यशस्वी केली.
हरवनजवळील दाचिगाम नॅशनल पार्कच्या उंच भागात दहशतवादविरोधी ऑपरेशन सोमवारी सकाळपासून सुरू करण्यात आलं. गुप्त माहितीनंतर सुरक्षादलांनी या भागात सर्च ऑपरेशन सुरू केलं असता, जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात भारतीय जवानांनी जोरदार कारवाई करत तीन अतिरेक्यांना ठार केलं. सध्या परिसरात आणखी दहशतवादी उपस्थित असण्याची शक्यता लक्षात घेता अतिरिक्त फोर्स तैनात करण्यात आले आहे.हे ऑपरेशन विशेषतः २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जात आहे. या भ्याड हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादविरोधी कारवायांचा वेग वाढवण्यात आला. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे हे ‘ऑपरेशन महादेव’.
याआधी मे महिन्यात भारताने सीमापार 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी हल्ले केले होते. यामध्ये केवळ दहशतवाद्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर पाकिस्तानकडून पूंछ जिल्ह्यात नागरी ठिकाणे आणि धार्मिक स्थळांवर लक्ष्य साधण्यात आलं. यात स्थानिक घरे, मंदिर, गुरुद्वारा आणि चर्चसारख्या महत्त्वाच्या स्थळांचं नुकसान झालं.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संसदेत सुरु असलेल्या चर्चेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पहलगाम हल्ल्याविषयी उत्तर मागितलं होतं. त्याचवेळी 'ऑपरेशन महादेव'मधून मिळालेल्या यशानं देशवासीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल टाकलं गेलं आहे.