| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - मंगळवार दि. २९ जुलै २०२५
राज ठाकरे यांनी तब्बल १३ वर्षांनंतर पुन्हा ‘मातोश्री’चा उंबरठा ओलांडला आणि उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या. हा क्षण केवळ कौटुंबिक नव्हता, तर राजकीय वर्तुळात मोठ्या संकेतांचे प्रतीक ठरला. नुकत्याच पार पडलेल्या ५ जुलैच्या मेळाव्यानंतर ठाकरे बंधूंमधील ही दुसरी जाहीर भेट ठरली आहे.
ही सौहार्दपूर्ण भेट जशी भावनिकदृष्ट्या महत्त्वाची वाटते, तशीच ती राजकीय भूकंपाची चाहूल देणारी ठरतेय. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीचं वलय आता अधिक ठळक होताना दिसतंय. विशेषतः मुंबई, ठाणे, नवी मुंबई या क्षेत्रांमध्ये या दोन्ही पक्षांची ताकद पुन्हा एकत्र झाल्यास राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात.
भाजपने नुकताच केलेला सर्व्हेक्षण अहवाल याचीच साक्ष देतो. या सर्व्हेनुसार, उद्धव-राज यांची युती झाल्यास त्यांना तब्बल ५२ टक्क्यांपर्यंत मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. यामुळे महायुतीला या भागात मोठा झटका बसू शकतो. विशेष म्हणजे, भाजप स्वतःच दर पंधरा दिवसांनी जनमताचा अंदाज घेण्यासाठी विश्लेषण करत असून, ही आकडेवारी त्यांच्यासाठी धोक्याचा इशारा मानली जात आहे.जर ही युती झाली नाही, तर शिवसेना उबाठाला सुमारे २४ टक्के आणि मनसेला सुमारे १२.५ टक्के मतं मिळू शकतात, असा दुसरा अंदाज या सर्वेक्षणातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे एकत्र लढल्यास मतांचे एकत्रित प्रमाण आणि जनाधार या दोन्हींच्या तुलनेत प्रचंड उंचावण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगर प्रदेशात येणाऱ्या ९ महापालिकांमध्ये पुढील निवडणुकांचं चित्र या संभाव्य युतीमुळे पूर्णपणे पालटू शकतं. विशेषतः मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मिरा-भाईंदर अशा मुख्य महानगरपालिका निवडणुकांवर या युतीचा थेट प्रभाव पडेल, अशी स्पष्ट चिन्हं आहेत.राज ठाकरे यांचा मातोश्री दौरा, फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छांपुरता मर्यादित नसून भविष्यातील राजकीय समीकरणांची पूर्वसूचना ठरतोय. ठाकरे बंधूंमधील ही नव्याने निर्माण होणारी जवळीक राज्याच्या राजकारणात मोठे वळण घेऊन येईल, असा अंदाज आता उघडपणे व्यक्त केला जात आहे.