| सांगली समाचार वृत्त |
शिराळा - मंगळवार दि. २९ जुलै २०२५
बत्तीस शिराळ्यात यंदा पारंपरिक नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर २१ स्थानिकांना जीवंत नाग सादर करण्यासाठी सशर्त परवानगी मिळाली आहे. नाग संवर्धन व शिक्षणाच्या उद्देशाने २७ ते ३१ जुलैदरम्यान नाग पकडण्यास परवानगी देण्यात आली असून, ही कारवाई वन विभागाच्या देखरेखीखालीच होणार आहे.
या २१ अर्जदारांनी पर्यावरण मंत्रालयाकडे नाग संवर्धनाच्या पारंपरिक ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अधिकृत परवानगी मागितली होती. त्यानुसार, नवी दिल्ली येथील वन्यजीव विभागाने अटी-शर्तींच्या अधीन राहून परवानगी जाहीर केली आहे. मात्र, या परवानगीचा उपयोग केवळ शिक्षण व स्थानिक संस्कृती संवर्धनासाठीच होणार असून कोणतीही स्पर्धा, खेळ, मिरवणूक किंवा व्यावसायिक हेतू यासाठी स्पष्टपणे बंदी घालण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, ज्या व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे, त्यांना नाग केवळ अधिकृत वन्यजीव अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच पकडता येणार आहेत. नागांची सुरक्षितता सर्वोच्च मानली असून कोणत्याही प्राण्याचा जीव जाऊ नये, यासाठी कडक सूचना दिल्या आहेत. पकडलेले नाग मूळ अधिवासात सुखरूप सोडणे बंधनकारक ठरवण्यात आले आहे.शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या शिराळ्याच्या नागपंचमी उत्सवात पूर्वी जिवंत नागांची पूजा आणि मिरवणूक होत असे. परंतु, 2002 साली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ही प्रथा थांबवावी लागली होती. यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा ही परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यांच्या सातत्याने केलेल्या मागणीला प्रतिसाद देत अखेर २१ जणांना सशर्त परवानगी मिळाल्याने गावात समाधान व्यक्त होत आहे.
थोडक्यात
- २१ अर्जदारांना २७ ते ३१ जुलैदरम्यान सशर्त परवानगी
- केवळ शैक्षणिक व सांस्कृतिक उद्देशांसाठीच परवानगी
- मिरवणूक, स्पर्धा, खेळ, मनोरंजनावर बंदी
- वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच नाग पकडण्याची सक्ती
- नागांचा जीव वाचवणे आणि त्यांना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडणे अनिवार्य