yuva MAharashtra "महाराष्ट्राच्या मनात नेमकं काय आहे, हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल" – मुख्यमंत्री

"महाराष्ट्राच्या मनात नेमकं काय आहे, हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल" – मुख्यमंत्री

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - सोमवार दि. २८ जुलै २०२५

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे महाराष्ट्राच्या मनाचा आरसा ठरणार आहेत, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने आपला कौल स्पष्टपणे दिला होता आणि त्याच धर्तीवर स्थानिक निवडणुकांतही जनमत दिसून येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. काही नेत्यांच्या व्यक्तिगत भूमिकेला संपूर्ण राज्याच्या भावना म्हणणे चुकीचं ठरेल, हेही त्यांनी ठामपणे नमूद केलं.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्याचा विषय चर्चेत असतानाच, फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना यामध्ये राजकीय संकेत शोधणे गैर असल्याचं सांगितलं. "शुभेच्छा देणं ही मानवी भावना आहे, राजकारणाचा भाग नव्हे," असे सांगत त्यांनी स्वतःही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात झालेल्या शाब्दिक पत्रव्यवहारावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट मत मांडलं. शासनातील मंत्रिपदाची जबाबदारी महत्त्वाची असून, आपापसात संवाद साधून मतभेद दूर करावेत, असा सल्ला त्यांनी दिला. “राज्यमंत्रीही शासनाचा भाग असून त्यांनाही बैठका घेण्याचा अधिकार आहे. मात्र धोरणात्मक निर्णय घेताना संबंधित मंत्र्याशी समन्वय साधावा,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर अटकेत आल्याच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी मितभाषी प्रतिक्रिया दिली. "मी या घटनेची सविस्तर माहिती घेऊ शकलेलो नाही, मात्र माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार कारवाईत अमली पदार्थ सापडल्याचं कळतंय," असं सांगून त्यांनी संपूर्ण माहिती घेतल्यानंतर योग्य ती भूमिका स्पष्ट करू असं सांगितलं.