| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - गुरुवार दि. १० जुलै २०२५
आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळे निर्माण होणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने एक आनंददायक पाऊल उचलले आहे. अर्थ मंत्रालयाने देशातील सर्व सार्वजनिक बँकांना शैक्षणिक कर्ज देण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, ही प्रक्रिया आता फक्त १५ दिवसांत पूर्ण केली जाणार आहे.
या नव्या निर्णयामुळे यापुढे विद्यार्थ्यांना महिनोंमहिने बँकांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तसेच, बँकांनी केंद्रीकृत प्रणाली तयार करून ‘विद्या लक्ष्मी पोर्टल’शी थेट जोडले जाण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यामुळे एकाच ठिकाणी अनेक बँकांच्या कर्ज पर्यायांची माहिती घेणे, तुलना करणे आणि अर्ज करणे शक्य होईल.
कर्ज प्रक्रियेला वेग – निर्णयात पारदर्शकता
कर्ज अर्ज फेटाळण्यासाठी आता फक्त एका वरिष्ठ अधिकाऱ्याची मान्यता आवश्यक असेल, आणि त्याचे कारण स्पष्टपणे विद्यार्थ्याला कळवणे बंधनकारक असेल. यामुळे कर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढणार आहे.
अर्ज कमी, कर्जही घटले – सरकारची चिंता
गेल्या दोन वर्षांत शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या आणि कर्ज वितरणाच्या रकमेत लक्षणीय घट झाली आहे.
2022-23: ७.३६ लाख अर्ज / ₹२८,६९९ कोटी वाटप
- 2023-24: ६.२९ लाख अर्ज / ₹२४,९९७ कोटी वाटप
ही घट लक्षात घेता, विद्यार्थ्यांना कर्जासाठी अनुकूल वातावरण मिळावे म्हणून हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होते.
कर्जाचे तपशील – व्याजदर, परतफेड व सुविधा
सध्या शैक्षणिक कर्जावर देशातील बँकांकडून ७% ते १६% पर्यंत व्याजदर आकारला जातो. ग्रामीण बँकांमध्ये हा दर थोडा कमी असून ८.५% ते १३.६०% च्या दरम्यान आहे.
- देशांतर्गत शिक्षणासाठी – ₹५० लाखांपर्यंत
- परदेशी अभ्यासक्रमांसाठी – ₹१ कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध
- परतफेड कालावधी – १५ वर्षांपर्यंत
- मोरेटोरियम सुविधा – अभ्यासक्रम संपल्यानंतर ६ महिने ते १ वर्ष
- आयकर सवलत – कलम ८०ई अंतर्गत ८ वर्षांपर्यंत व्याजावर सूट
- मोठ्या रकमेच्या कर्जासाठी तारण आवश्यक
- ‘विद्या लक्ष्मी पोर्टल’ – एकच ठिकाणी अनेक पर्याय
शासनाच्या 'विद्या लक्ष्मी' पोर्टलमुळे विद्यार्थ्यांना बँक दरम्यान फेरफटका न मारता एकाच प्लॅटफॉर्मवर कर्जाची संपूर्ण माहिती मिळू शकते. अर्ज, तुलना, आणि निवड – सगळं काही एका क्लिकवर.
शिक्षण हीच खरी संपत्ती हे लक्षात घेता, शासकीय निर्णय विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याच्या दिशेने एक ठोस मदत ठरणार आहे.