yuva MAharashtra श्रावण मास आणि पर्युषण पर्वातील जैन जीवनशैली – प्रा. एन. डी. बिरनाळे, सांगली

श्रावण मास आणि पर्युषण पर्वातील जैन जीवनशैली – प्रा. एन. डी. बिरनाळे, सांगली

             फोटो सौजन्य : चॅट जीपीटी

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. २५ जुलै २०२५

श्रावण महिना २५ जुलैपासून सुरू होऊन २३ ऑगस्टला समाप्त होतो. या संपूर्ण काळात जैन धर्मीयांच्या धार्मिक आणि नैतिक जीवनशैलीला विशेष उर्जा प्राप्त होते. हिंदू धर्मात जसा श्रावण मास श्रद्धेचा आणि उपासनेचा काळ मानला जातो, तसाच हा महिना जैन समाजासाठी चातुर्मास व पर्युषण पर्वाच्या अनुषंगाने आत्मशुद्धी व आचरण शुद्धीचा काळ ठरतो.

धार्मिकतेतून सदाचाराची वाट

जैन धर्म हे केवळ उपासना पद्धतींना मर्यादित नसून आचारधर्म, आत्मसंयम, आणि सहिष्णुता या मूल्यांवर आधारित एक व्यापक नैतिक तत्त्वज्ञान आहे. जैन समाजातील विविध व्रते, उपवास, पूजाविधी हे परंपरेचे पालन करतानाच मानवी मूल्यांची जोपासना करणारे आहेत. तीर्थंकर पूजाही केवळ कर्मकांड नसून जीवनशुद्धीचा प्रयत्न असतो.

पर्युषण पर्व: आत्मशुद्धीचा उत्सव

जैन धर्मातील सर्वोच्च पर्व समजले जाणारे ‘पर्युषण’ म्हणजे आत्ममंथनाचा, क्षमायाचनेचा आणि संयमाचा काळ. 'पर्युषण' या संकल्पनेचा अर्थ आहे – बाह्य गोष्टींपासून दूर जाऊन अंतर्मुख होणे. हा पर्वराज दहा दिवसांचा असतो. यामध्ये श्रद्धाळू भक्त जिनमंदिरात नियमितपणे पूजाअर्चा, आत्मचिंतन, आणि तत्त्वज्ञानाधारित प्रवचने ऐकतात. क्षमा, ब्रह्मचर्य, सत्य, अपरिग्रह यांसारख्या जीवनमूल्यांवर भर दिला जातो.

या काळात अनेकजण उपवास करतात — काही जण सलग दहा दिवस अन्नत्याग करतात. त्यामुळे शरीराला विश्रांती, मनाला शांती आणि आत्म्याला स्थिरता मिळते. हे पर्व स्वतःच्या वर्तनाचे आत्मपरीक्षण करण्याची, चुकांसाठी क्षमा मागण्याची आणि नव्या उर्जेसह जीवनाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देते.

संयम, तप, आणि भक्तीचा कालखंड

भारतीय परंपरेत श्रावण मास धार्मिक उत्कटतेचा मानबिंदू असला तरी, जैन धर्मीयांसाठी तो तपश्चर्येचा, स्वाध्यायाचा आणि पवित्रतेचा प्रतीक काल मानला जातो. या महिन्यात अनेक तीर्थंकरांचे विविध ‘कल्याणक’ साजरे केले जातात – जन्म, गर्भधारण, दीक्षा, केवलज्ञान आणि मोक्षप्राप्ती. मंदिरात विशेष अभिषेक, पूजाविधी, आणि उपदेशकांचे प्रवचने आयोजित केली जातात.

पावसाळ्यात सूक्ष्म जीवसृष्टीचे प्रमाण वाढते, म्हणून या काळात जैन साधू-साध्वी विहार न करता एका स्थानीच तपश्चर्येस मनोयोगाने समर्पित राहतात. त्यांच्याजवळ जाऊन भक्त मंडळी उपदेश घेतात, मनोमन विचार करतात आणि जर काही चुकले असेल तर प्रायश्चित्तही करतात.

विशेष व्रत, पूजा व आध्यात्मिक जागर

श्रावण महिन्यात जैन धर्मीय लोपी/नोपी व्रत घेतात. यामध्ये दशलक्षण, षोडशकारण पूजांसह मुकुट सप्तमी आणि आयुषी एकादशीचे व्रत पाळले जाते. हे व्रत केवळ अध्यात्मिक लाभाचेच नव्हे, तर शरीरसंपदा, मानसिक शांती आणि आयुष्यात संतुलन टिकवण्यासाठी उपयोगी मानले जातात.

या काळात महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील भट्टारक मठात ज्वालामालिनी अलंकार पूजाविधान, हुमचामध्ये पद्मावती पूजासोहळा, साजणी व स्तवनिधी क्षेत्रांमध्ये पालखी व विशेष पूजाविधी पार पडतात. याशिवाय, १६ ऑगस्ट रोजी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे आणि १८ ऑगस्टला गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या पुण्यतिथीप्रसंगी त्यांच्या कार्याचा गौरव करीत धर्मोपदेश होतो.

एकात्मतेचा आणि पर्यावरण जागृतीचा संदेश

श्रावणातील विविध उपासना, पूजाविधी आणि धार्मिक सण हे केवळ अध्यात्मापुरते मर्यादित न राहता – आरोग्य, पर्यावरण रक्षण, बंधुता आणि सामाजिक सहअस्तित्व यांचा जागर घडवणारे ठरतात. संयमित आहार, अहिंसात्मक वर्तन, आणि क्षमायाचना यांच्या माध्यमातून जैन जीवनशैली आजच्या यांत्रिक युगातही मूल्याधिष्ठित जीवनाचा आदर्श ठरते.
---

प्रा. एन. डी. बिरनाळे
सांगली