yuva MAharashtra राजधानीत महाराष्ट्राच्या सात खासदारांची दिल्लीवर स्वारी; संसदरत्न पुरस्काराने गौरव

राजधानीत महाराष्ट्राच्या सात खासदारांची दिल्लीवर स्वारी; संसदरत्न पुरस्काराने गौरव

               फोटो सौजन्य : चॅट जीपीटी

| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - रविवार दि. २७ जुलै २०२५

संसदेतील उत्कृष्ट योगदानासाठी देशभरातून निवडलेल्या १५ खासदारांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांनी आपले वेगळेपण सिद्ध करत राष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवला.

भाजपच्या श्रीरंग बारणे, तसेच संसदेत प्रभावी सहभागासाठी ख्यात असलेल्या भर्तृहरी महताब आणि एन. के. प्रेमचंद्रन यांना विशेष संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. तर अरविंद सावंत (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे), वर्षा गायकवाड (काँग्रेस), स्मिता वाघ (भाजप), नरेश म्हस्के (शिवसेना - शिंदे गट) आणि मेधा कुलकर्णी (भाजप) यांनाही संसदेत उल्लेखनीय कार्यगिरीसाठी पुरस्कार प्राप्त झाला.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे पार पडलेल्या या समारंभात संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. एक स्वयंसेवी संस्था दरवर्षी या पुरस्काराचे आयोजन करते.

यावेळी बोलताना मंत्री रिजिजू यांनी संसदेतील सद्यस्थितीवर भाष्य करत स्पष्ट केले की, सध्या सभागृहात गोंधळ घालणाऱ्यांचेच नाव पुढे येते, पण शांतपणे अभ्यासपूर्ण बोलणाऱ्यांकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यांनी शरद पवारांच्या कृषीमंत्री कार्यकाळातील एक आठवण सांगत संसदेत सकारात्मक चर्चा किती महत्त्वाची असते हे अधोरेखित केले.

या पुरस्कार यादीत सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) व भाजपचे निशिकांत दुबे यांचाही समावेश होता, मात्र दोघेही या समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत. विशेषतः अलीकडील भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर निशिकांत दुबे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

पुरस्कार विजेते खासदारांची यादी:

स्मिता वाघ (भाजप)

अरविंद सावंत (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)

नरेश म्हस्के (शिवसेना - एकनाथ शिंदे गट)

वर्षा गायकवाड (काँग्रेस)

मेधा कुलकर्णी (भाजप)

प्रवीण पटेल, रवी किशन, निशिकांत दुबे, विद्युत बरन महतो, पी. पी. चौधरी, मदन राठोड, दिलीप सैकिया (सर्व भाजप)

सी. एन. अन्नादुराई (द्रमुक)

संसदीय समित्यांचाही गौरव

या सोहळ्यात संसदरत्न पुरस्काराच्या विशेष श्रेणीत दोन स्थायी समित्यांनाही गौरवण्यात आले. भाजपचे भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालील ‘वित्त स्थायी समिती’ व काँग्रेसचे चरणजितसिंग चन्नी यांच्या नेतृत्वाखालील ‘कृषी स्थायी समिती’ यांचा यामध्ये समावेश होता.