yuva MAharashtra नांदणीच्या मठासाठी यांत्रिक हत्तीचा प्रस्ताव; परंपरेतून करुणेचा मार्ग

नांदणीच्या मठासाठी यांत्रिक हत्तीचा प्रस्ताव; परंपरेतून करुणेचा मार्ग

              फोटो सौजन्य : पेटा इंडिया

| सांगली समाचार वृत्त |
नांदणी - रविवार दि. २७ जुलै २०२५

जैन धर्मीय आणि प्राणी कल्याणासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांच्या वतीने, द फेडरेशन ऑफ इंडियन अ‍ॅनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन्स (FIAPO) या २०० हून अधिक संघटनांच्या अखिल भारतीय मंचाने कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाला एक अद्वितीय अशी भेट देण्याचा प्रस्ताव दिला आहे – खऱ्या हत्तीप्रमाणे दिसणारा आणि चालणारा मैकेनिकल हत्ती!

हा पर्याय केवळ प्राणीकल्याणाचाच विचार करणारा नसून, पारंपरिक धार्मिक विधींमध्येही त्याचे सुसंगत योगदान राहील, असे एफआयएपीओचे म्हणणे आहे. मठात वापरल्या जाणाऱ्या 'महादेवी' नावाच्या हत्तीणीच्या दीर्घकाळ चाललेल्या एकटेपणाच्या पार्श्वभूमीवर आणि तिच्या पुनर्वसनाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर हा प्रस्ताव समोर आला आहे.

हत्तींसारख्या संवेदनशील प्राण्यांना धार्मिक कार्यक्रमांसाठी एकाकी आणि कृत्रिम वातावरणात ठेवणे ही एक गंभीर समस्या असून, यावर यांत्रिक हत्ती हे एक करुणामय आणि कायदेशीर पर्याय ठरू शकतात. अशा यांत्रिक हत्तींचा वापर धार्मिक विधी, मिरवणुका, विवाह समारंभ यामध्ये सहजपणे केला जाऊ शकतो. त्यांचा चेहरा, सोंड, कान, शेपटी, अगदी डोळ्यांचे हालचाल देखील खऱ्या हत्तीप्रमाणे वाटते. ते चाकांवर चालणारे असल्यामुळे हलवणेही सोयीचे होते.

एफआयएपीओच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भारती रामचंद्रन यांनी मठाधीशांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, असा यांत्रिक हत्ती स्वीकारल्याने ना केवळ मठाची परंपरा जोपासली जाईल, तर त्यात करुणेची भावना व कायदेशीर जबाबदारीही सामाविष्ट होईल. भारतातील अनेक मंदिरांनी यापूर्वीच अशा हत्तींना स्वीकारले असून, भक्तगणही हे परिवर्तन श्रद्धेने स्वीकारत आहेत.

या मठातील हत्तीणीला ३० वर्षांहून अधिक काळ एकटेपणात, साखळदंडात ठेवण्यात आले होते. तिच्या शारीरिक व मानसिक आजारांविषयी स्वतंत्र वैद्यकीय समितीने सखोल निरीक्षण करत चिंता व्यक्त केली होती. ती दीर्घकाळ बंदिस्त राहिल्यामुळे तिला मानसिक तणाव, सांधेदुखी, पायांच्या दुखापती अशा गंभीर समस्या उद्भवल्या. यामुळेच ती २०१७ साली एका पुजाऱ्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त झाली होती.

एफआयएपीओचा प्रस्ताव म्हणजे केवळ एक भौतिक वस्तूची देणगी नाही, तर ही एक सकारात्मक पावले आहेत – जिथे परंपरा, श्रद्धा आणि करुणा यांचे सुंदर संमेलन घडवता येते. यांत्रिक हत्तीमुळे हत्तींच्या जबरदस्तीच्या वापराला पर्याय निर्माण होतो आणि धार्मिक विधी अधिक भव्यतेने पार पाडता येतात.

सध्या भारतातील किमान १७ मंदिरांमध्ये अशा यांत्रिक हत्तींचा यशस्वी वापर केला जात आहे. हे हत्ती रबर, फायबर, स्टील आणि इतर सुरक्षित साहित्यांपासून बनवलेले असतात. त्यांच्यामध्ये ५ शक्तिशाली मोटर्स असतात, आणि ते सहज प्लग-इन करून कार्यान्वित करता येतात. या प्रकारच्या हत्त्यांवर सजावट करून, भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र बनवले जाऊ शकते.

 मठाने हा अभिनव आणि करुणेचा पर्याय स्वीकारल्यास, तो इतर संस्थांसाठी आदर्श ठरेल, असा एफआयएपीओचा विश्वास आहे.