| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - रविवार दि. २७ जुलै २०२५
आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या टूथपेस्ट, केसांना लावायचं तेल आणि बाम यांसारख्या वस्तूंमधील काही घटक मेंदूच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असा गंभीर इशारा मेंदूविकार तज्ज्ञांनी दिला आहे.
या उत्पादनांमध्ये असणारी विशिष्ट रसायनं त्वचेमार्गे शरीरात प्रवेश करून थेट मेंदूतील न्यूरॉन्सवर परिणाम करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. मेंदूतील हा ताण-उत्तेजनाचा प्रभाव कालांतराने मायग्रेन, अपस्मार, मानसिक अस्थिरता अशा आजारांचं कारण ठरू शकतो, असं मत वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केलं.
अत्युत्साही न्यूरॉन्स – जबाबदार घटक कोणते?केसांचं तेल, बाम आणि टूथपेस्टमध्ये आढळणारी विशिष्ट रासायनिक संयुगे त्वचेद्वारे सहजपणे शोषली जातात. ही संयुगे मेंदूतील न्यूरल नेटवर्कवर वारंवार परिणाम करून ते अधिक संवेदनशील करतात. परिणामी, मेंदूची सर्किट्स सतत सक्रिय राहतात. यामुळे काही लोकांमध्ये मायग्रेनचे झटके, संतुलन बिघडणे, अपस्माराचे झटके, पॅनिक अटॅक किंवा नैराश्यसारख्या समस्या दिसून येतात.प्राथमिक निरीक्षणांतून महत्त्वाची माहितीडॉ. मेश्राम यांच्या मते, काही रुग्णांमध्ये टूथपेस्टच्या वापरात बदल केल्यावर लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. उदाहरणार्थ, एका आंतरराष्ट्रीय अभ्यासात टूथपेस्टमुळे क्लस्टर डोकेदुखी उद्भवल्याचं नमूद करण्यात आलं. याच रुग्णाला टूथपेस्टचा वापर थांबवल्यावर अवघ्या दोन आठवड्यांत आराम मिळाल्याचंही नोंदवण्यात आलं आहे.
आरोग्यासाठी पर्यायी उपाय
टूथपेस्टऐवजी मिठाच्या पाण्याचा किंवा स्वच्छ पाण्याचा वापर सुरक्षित पर्याय ठरू शकतो, असं मत न्यूरोलॉजिस्ट डॉ. मॅथ्यू यांनी नोंदवलं. काही रुग्णांनी हे पर्याय अवलंबल्यावर त्यांची डोकेदुखी किंवा मानसिक तणावाची तीव्रता कमी झाल्याचं दिसून आलं.
धोका कोणाला अधिक?
ज्यांना आधीपासूनच डोकेदुखी, अपस्मार, चिंता, चक्कर किंवा नैराश्यासारखे विकार आहेत, त्यांच्यासाठी हे उत्पादन अधिक धोका निर्माण करू शकतात. तसेच ज्यांची त्वचा अधिक संवेदनशील आहे, अशांनाही हे घटक गंभीर परिणाम घडवू शकतात.
टीप: कोणतेही उत्पादन वापरण्याआधी त्यातील घटक तपासणे, तसेच लक्षणे जाणवू लागल्यास तज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.