yuva MAharashtra सण-उत्सवांदरम्यान पोलिसांचा कटाक्ष; डॉल्बीच्या थर्रारावर कडक निर्बंध

सण-उत्सवांदरम्यान पोलिसांचा कटाक्ष; डॉल्बीच्या थर्रारावर कडक निर्बंध

                 फोटो सौजन्य : Wikimediacommons

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. २७ जुलै २०२५

आगामी नागपंचमी, गणेशोत्सव आणि अन्य धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कता बाळगण्याचा निर्णय घेतला असून, डीजे आणि डॉल्बी व्यवस्थापनावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. यासंदर्भात सांगली उपविभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या डीजे चालक व डॉल्बी मालकांची विशेष बैठक नुकतीच पार पडली.

या बैठकीत सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला एम यांच्यासह सांगली शहर व ग्रामीण विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व संबंधितांना कायद्यानुसार ध्वनी मर्यादेचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार, धार्मिक तेढ वाढवणारी, बिभत्स किंवा समाजविघातक गाणी वाजवणे पूर्णतः प्रतिबंधित असून, अशा प्रकारचा प्रयत्न केल्यास संबंधित डॉल्बी मालक आणि मंडळ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल.

शहरातील प्रत्येक डीजे यंत्रणा आणि डॉल्बी संचाची माहिती गोळा करण्यात येत असून, उत्सव काळात कुणाही नागरिकास - विशेषतः वृद्ध, बालक किंवा गर्भवती महिलांना - त्रास होईल अशा स्वरूपाचा आवाज नको, असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

पोलिसांनी सामाजिक शांततेच्या दृष्टीने मंडळ पदाधिकाऱ्यांना सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही अनुचित प्रकारास स्थान दिले जाणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.