| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. २७ जुलै २०२५
सांगली शहरातील गावभाग परिसरात एका घरात घडलेल्या घरफोडीत चोरट्याने अंदाजे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी भावेवाडा येथे घडली असून, या प्रकरणी सुजाता अनिल पाटील (वय ५५) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सुजाता पाटील या खासगी कंपनीत काम करत असून त्या जैन बस्ती शेजारील भावेवाड्यात राहतात. १२ जूनच्या रात्री साडेसातच्या सुमारास त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील मुख्य दरवाजा उघडाच होता. याचा फायदा घेत चोरट्याने घरात प्रवेश केला आणि थेट बेडरूममधील कपाटात ठेवलेल्या पर्समधून दागिन्यांची चोरी केली.
ही घटना घडून गेल्यानंतर काही काळ सुजाता पाटील यांच्या तब्येतीवर परिणाम झाल्याने त्या तातडीने तक्रार देऊ शकली नाहीत. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर तपासाची दिशा घेतली आहे.