| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. ३१ जुलै २०२५
बेंद्री येथील तलाठी मुमताज इब्राहिम मुलानी यांच्यावर पदाचा गैरवापर, बनावट नोंदींची निर्मिती, जमिनीच्या मालकी हडप करण्याचे प्रयत्न, बनावट गुन्ह्यांची नोंद व जबाबदारी झटकण्याचे प्रकार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय, लाच स्वीकारताना रंगेहाथ अटकेतील प्रकरणामुळे त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, तलाठ्याच्या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून, अवैध मार्गाने मिळवलेली संपत्ती सरकारकडे जप्त करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यासंदर्भात धरणे आंदोलन पार पडले.
या आंदोलनाचे नेतृत्व मुसा मुलानी, सतीश पाटील, किरण शिंदे, जहांगीर शेख, सुनील दादा पाटील, आनंदा पाटील, मुन्ना घाडगे, पांडुरंग पाटील यांनी केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुपूर्द केले.
सरकारी यंत्रणांनी त्वरित कारवाई न केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागासमोर घंटानाद आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
आंदोलनादरम्यान “भ्रष्टाचाऱ्यांचा निषेध असो – प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा जयजयकार असो!” अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. धुळगाव व कुमठे परिसरासह अनेक गावांतील ग्रामस्थ, ज्यात सुभाष देवकुळे, संजय भोसले, शकील मगदूम, फिरोज मगदूम, रमजान येलुरकर, अल्लाउद्दीन मगदूम आदींचा सक्रिय सहभाग होता.