| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. ३१ जुलै २०२५
सांगली जिल्हा पोलीस दलात अंमली पदार्थ शोधण्यासाठी विशेष प्रशिक्षित करण्यात आलेल्या ‘लुसी’ या जर्मन शेफर्ड जातीच्या पोलीस श्वानाने नुकतीच आपली अखेरची श्वास घेतली. तिच्या निधनाने पोलीस दलामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. २ जुलै २०१७ रोजी जन्मलेली लुसी मे २०१८ पासून सेवेत होती. राजस्थानमधील अलवा येथील श्वान प्रशिक्षण केंद्रामध्ये तिने सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अंमली पदार्थ शोधक श्वान म्हणून सांगली जिल्हा पोलीस दलात तिने आपले कार्य सुरू केले होते.
लुसीच्या श्वान सेवेत पोहेका तौफिक सय्यद व पोह विनोद थोरात हे तिचे हस्तक (डॉग हँडलर) म्हणून सातत्याने कार्यरत होते. तिच्या सेवाकाळात लुसीने विविध अत्यंत संवेदनशील व गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पोलीस यंत्रणेला मोलाचे सहकार्य केले. विशेषतः २०२० मध्ये इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गांजाच्या मोठ्या साठ्यावर छापा टाकताना तिने तब्बल १३ लाख ६९ हजार रुपयांचा अंमली मुद्देमाल शोधून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकांच्या काळात आंतरराज्य सीमांवर तपासणी नाक्यांवर अनेक वाहनांची तपासणी करत असताना लुसीने अंमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत केली होती. कोल्हापूर परिक्षेत्रीय कर्तव्य मेळाव्यातही तिची कामगिरी विशेष ठरली होती.सात वर्षे आणि दोन महिन्यांच्या अतुलनीय सेवेनंतर काही दिवसांपूर्वी लुसीने अन्न सेवन थांबवल्यानंतर तिची प्रकृती खालावली. तत्काळ मिरज येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानुसार, किडणी निकामी होणे आणि हृदयविकारामुळे तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
लुसीच्या निधनानंतर पोलीस मुख्यालय, सांगली येथे शासकीय इतमामात तिचे अंत्यसंस्कार पार पडले. मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे, पोलीस उपअधीक्षक (गृह) अरविंद बोडके, पोलीस निरीक्षक बाळासाहेब अलदर, श्वान पथक प्रभारी निवास मोरे यांच्यासह शेकडो पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत तिच्या सेवा कार्याला सन्मानाने निरोप दिला.
‘लुसी’चा कार्यकाल हा केवळ सेवाभावी नव्हता, तर ती पोलीस दलाची अभिमानास्पद आणि निष्ठावान घटक ठरली होती. तिचे योगदान सदैव स्मरणात राहील.