| सांगली समाचार वृत्त |
मिरज - गुरुवार दि. ३१ जुलै २०२५
मिरज येथील १२ वर्षांपासून अकार्यक्षम असलेल्या शासकीय डेअरीच्या ४६ एकर जागेपैकी तीन एकर जागा ओबीसी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी वापरण्यात येणार आहे. बाबू जगजीवन राम छात्र आवास योजनेंतर्गत हे वसतिगृह उभारले जाणार असून, या प्रयोजनासाठी ही जागा बहुजन कल्याण विभागाकडे सुपूर्द करण्याचा आदेश राज्य सरकारने बुधवारी निर्गमित केला.
सन् १९६५ पासून सुरू असलेली ही डेअरी योजना बंद पडल्याने जागा निष्क्रिय अवस्थेत पडून होती. पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात ही जागा असली, तरी तिचा योग्य उपयोग व्हावा, यासाठी स्थानिक पातळीवर मागणी होत होती.आता या विस्तीर्ण क्षेत्रातून दीड एकर जागा मुलींच्या व दीड एकर जागा मुलांच्या निवासासाठी निश्चित करण्यात आली आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या संयुक्त निर्णयानुसार ही जागा अधिकृतपणे बहुजन कल्याण विभागाकडे वर्ग केली जाणार आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार, ओबीसी घटकातील विद्यार्थ्यांसाठी राज्यात जिल्हास्तरावर निवासगृहांची उभारणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दुग्ध व्यवसाय विभागाच्या अखत्यारीतील देशभरातील दहा ठिकाणच्या जागा यासाठी निश्चित करण्यात आल्या असून, यामध्ये सोलापूर, धुळे, धाराशिव, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गोंदिया तसेच मिरज येथील जागेचा समावेश आहे.
या वसतिगृहांची उभारणी करताना प्रत्येक जागेची अचूक मोजणी करून त्याची चौकट (चतु:सीमा) निश्चित केली जाणार असून, शासनाच्या सर्व नियमानुसार जागा हस्तांतरित केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.