| सांगली समाचार वृत्त |
मिरज - गुरुवार दि. ३१ जुलै २०२५
श्रावण महिन्यानिमित्त इचलकरंजीच्या टाकवडे गावातून पायी दिंडीचा भव्य प्रारंभ झाला. देवगोंडा पाटील यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या अध्यात्मिक सोहळ्यात सुमारे ६०० वारकरी सहभागी झाले होते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेदरम्यान श्रावणी यात्रेनिमित्त पंढरपुरात भाविकांची लक्षणीय उपस्थिती असते.
या भाविकांचा मुक्काम मिरजेमधील बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या प्रांगणात झाला. त्या ठिकाणी वारकऱ्यांना आजचा महाप्रसाद मिरजेचे समाजसेवक चंद्रकांत जगताप यांच्या पुढाकारातून वितरित करण्यात आला.
या धार्मिक यात्रेचे आरोग्यिक महत्त्व लक्षात घेऊन चंदनवाडी, मिरज येथील मातृ सेवा मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे विशेष मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. निखिल पाटील यांच्या देखरेखीखाली डॉ. आदित्य राज, डॉ. प्राची पुष्कर, सिस्टर संगीता जाधव आणि सहाय्यक मेहनुद्दीन गोलंदाज यांनी सेवाभावी भूमिका बजावत वारकऱ्यांची तपासणी केली.
शिबिरास सीएनसी डिप्लोमा कॉलेजचे राम हुन्नूरगे हे उपस्थित राहिले होते. तसेच शौचालयांची सुविधा ही महापालिकेच्या सहकार्याने डॉ. रवींद्र ताटे यांच्या देखरेखीखाली उपलब्ध करून देण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण सोहळा अधिक सुसंगत आणि सुविधायुक्त झाला.
या पायी दिंडीमध्ये भक्तिभाव, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. आरोग्य आणि महाप्रसादाचे उत्कृष्ट व्यवस्थेबाबत भाविकांकडून समाधान व्यक्त केले.