| सांगली समाचार वृत्त |
नांदणी - गुरुवार दि. ३१ जुलै २०२५
शिरोळ तालुक्यातील नांदणी गावामध्ये तब्बल तीन दशकांहून अधिक काळ श्रद्धेचं प्रतीक ठरलेली महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण अखेर सोमवारी (28 जुलै) रात्री नांदणी सोडून गुजरातच्या दिशेने रवाना झाली. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मठाच्या याचिकेला नकार दिल्याने, हत्तीणीच्या प्रस्थानाला भावनिक वातावरण निर्माण झाले.
गावकऱ्यांनी हत्तीणीवर आपल्या मुलीप्रमाणे प्रेम केलं होतं. तिनेही मठाच्या भक्तांपासून ते स्थानिकांपर्यंत सगळ्यांना स्नेहाने आपले केले. मात्र कायद्याच्या बंधनांपुढे सर्वांचे प्रेम हतबल ठरले. महादेवीला न्यायालयीन आदेशानुसार प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी यांच्या मालकीच्या 'वनतारा' या संस्थेकडे सुपूर्त करण्यात आले.
या घटनेमुळे गावात प्रचंड असंतोष पसरला. महादेवीच्या निरोपप्रसंगी काही संतप्त ग्रामस्थांनी तिच्या वाहतुकीच्या वाहनावर दगडफेक केली. तरीही पोलिस बंदोबस्तात महादेवीला गुजरातकडे रवाना करण्यात आले.
या निर्णयामुळे नाराज झालेल्या नांदणी आणि परिसरातील नागरिकांनी जीओ कंपनीच्या मोबाईल सेवांचा बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक नागरिकांनी आपल्या जीओ सीमकार्डचे अन्य कंपन्यांमध्ये पोर्टिंग सुरू केलं आहे. "आमचा हत्ती परत आणा, मगच जिओ सुरू करू," अशी ठाम भूमिका अनेकांनी ग्राहक सेवा प्रतिनिधींना थेट बोलून दाखवली आहे.
फक्त सीमकार्डपुरता हा निषेध मर्यादित राहिलेला नाही. स्थानिक नागरिकांनी अंबानी समूहाच्या इतर उत्पादनांचाही निषेध करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, जिओच्या ग्राहक सेवा केंद्रांवर बहिष्काराच्या कारणांसाठी येणारे शेकडो कॉल्स कंपनीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. बहिष्काराचा लोण हळूहळू नांदणीसह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पसरत आहे.ग्रामस्थांच्या मते, “आमच्या थोडक्याच लोकांनी काही फरक पडणार नाही, पण जर हे आंदोलन व्यापक झालं, तर परिणाम अटळ असतील." न्यायालयीन आदेशामुळे महादेवीला गावातून जावं लागलं असलं तरी तिच्यावरील प्रेम आणि आपुलकी हे नातं नांदणीकरांच्या मनातून अद्याप विसरले गेलेलं नाही.