| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. ३१ जुलै २०२५
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिकांवर थकित पाणीपट्टीचा बोजा वाढत चाललेला असतानाच, त्यावरील व्याज आणि विलंब शुल्क माफ करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी ठोस मागणी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिका क्षेत्रात पाणीपट्टी थकबाकीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून, त्यावर आकारण्यात येणाऱ्या व्याज व दंडामुळे नागरिक भरणा करण्यास उदासीन आहेत. ही अडचण लक्षात घेता, संबंधित शुल्कातून पूर्णतः सूट देण्याचा प्रस्ताव महापालिकेने शासन दरबारी मांडला आहे.या प्रस्तावास शासनाने त्वरीत मान्यता द्यावी, जेणेकरून थकबाकीदार नागरिक भरणा करण्यास प्रेरित होतील आणि महापालिकेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल, असेही आमदार गाडगीळ यांनी शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेत स्पष्ट केले.