yuva MAharashtra एचआयव्ही बाधितांसाठी विवाह परिचय मेळावा : समजुतीतून उभे राहो सहजीवन – जिल्हाधिकारी अशोक काकडे

एचआयव्ही बाधितांसाठी विवाह परिचय मेळावा : समजुतीतून उभे राहो सहजीवन – जिल्हाधिकारी अशोक काकडे

               फोटो सौजन्य : दै. ललकार

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. २१ जुलै २०२५

जीवनसाथी निवडताना नाते केवळ आजचे न राहता अखेरपर्यंत टिकावे, हेच खरे सहजीवनाचे सौंदर्य आहे. एकमेकांच्या भावनांना समजून घेत त्यांच्या आकांक्षांना आदर दिला पाहिजे. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवताना सर्व घटकांना सामावून घेणे अत्यंत गरजेचे आहे. सहजीवनात प्रेम, विश्वास, समजूत व कळकळ हीच खरी गुंतवणूक असते, अशा शब्दांत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विवाह इच्छुकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

एचआयव्ही संसर्गित व्यक्तींना सामाजिक स्वीकृती मिळावी, त्यांचं आयुष्य सन्मानानं आणि आनंदानं जगता यावं, या हेतूनं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या पुढाकाराने विवाह परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सांगली येथील मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, विविध एआरटी केंद्रे, सांगली मिशन सोसायटी, एनएमपी प्लस पुणे आणि अनेक स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या.

जिल्हाधिकारी काकडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संवाद हे कुठल्याही नात्याचे मूलभूत स्थान असून, समजून घेतल्याशिवाय कोणतीही साथ टिकत नाही. विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं नव्हे, तर दोन आयुष्यांचं नवं पर्व असतं. त्यासाठी आत्मपरीक्षण आणि बदलाची तयारीही आवश्यक असते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी एचआयव्ही बाधितांसाठी आरोग्यदायी जीवनशैलीच्या महत्त्वावर भर दिला. नियमित औषधोपचार, व्यायाम, सीडी४ तपासणी व वैद्यकीय सल्ला यांच्या शिस्तबद्ध पालनामुळे जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवता येतो, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी सांगितले की, या उपक्रमामध्ये सहभागी झालेले अनेकजण नियमित औषधोपचार घेणारे, चांगल्या आरोग्यस्थितीत असलेले आहेत. जिल्हाधिकारी काकडे यांच्या दूरदृष्टीतून आणि सहृदय संकल्पनेतून सामाजिक मुख्य प्रवाहात या घटकांचा समावेश करून घेण्याचे हे प्रयत्न आहेत.

कार्यक्रमासाठी आपला हॉल विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठा सेवा संघाचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी डॉ. संजय पाटील, मीना शेषु, समुपदेशक विश्वास मागाडे आणि महिपती बल्लाळ यांनी अनुक्रमे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमात दीपप्रज्वलनानंतर विवाह इच्छुक वधू-वर आणि त्यांच्या पालकांसाठी संवाद व ओळखीचे सत्र पार पडले. तब्बल २४५ जोड्यांचे नोंदणीकरण या मेळाव्यात झाले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या उमेदवारांच्या उपस्थितीमुळे या उपक्रमाला राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले.

हा उपक्रम केवळ वैयक्तिक जीवनात आनंद निर्माण करणारा नसून, समाजाच्या समतेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मतही मान्यवरांनी व्यक्त केले.