| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शुक्रवार दि. १८ जुलै २०२५
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी अधिक सुसज्ज व सुलभ प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने विजयनगर (कुपवाड) येथे नव्या मध्यवर्ती इमारतीच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केली आहे. विधानभवनातील अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
गाडगीळ यांनी स्पष्ट केले की, सध्या महापालिकेचे मुख्य कार्यालय सांगलीतील राजवाडा चौक परिसरात असून, मिरज व कुपवाड येथील नागरिकांना ते गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे प्रशासकीय सुविधा सर्व भागांमध्ये पोहोचाव्यात, या हेतूने विजयनगरमध्ये नव्या इमारतीचा प्रकल्प आवश्यक आहे. रिव्हिजन सर्वे क्रमांक १२५ मधील महापालिकेच्या ताब्यातील भूखंडावर ही इमारत उभारण्याचा विचार असून, या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ८१ कोटी १२ लाख ४६ हजार रुपये इतका आहे.
या प्रकल्पासाठी संपूर्ण निधी शासनाकडूनच मिळावा, अशी मागणी करताना गाडगीळ यांनी असेही सुचवले की, केंद्राच्या भांडवली सहाय्य योजनेंतर्गत किंवा तत्सम इतर योजनांमधून राज्य शासनाने आवश्यक तरतूद करावी. सध्याच्या प्रशासकीय इमारतीच्या मर्यादांमुळे, नवीन इमारतीचे काम अधिक काळ प्रलंबित न ठेवता तातडीने सुरू होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.