फोटो सौजन्य : दै. ललकार
| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. १८ जुलै २०२५
महाराष्ट्र विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक समोरासमोर येत भिडल्याची घटना आज गाजली. या गोंधळात पडळकरांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर मारहाण झाल्याचे समजते.
घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधी पक्षातील आमदार आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ही गंभीर बाब उचलून धरली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी सविस्तर अहवाल मागवला असून, योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी हा प्रकार अनवधानाने घडल्याचे म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी झटापटीविषयी अधिक माहिती नाकारली. या घटनेला पार्श्वभूमी होती काल झालेल्या शाब्दिक चकमकीची. कालच्या विधानसभेत पडळकर व आव्हाड यांच्यात तुंबळ शाब्दिक वाद झाला होता. त्यात अपमानास्पद भाषा वापरण्यात आल्याचा आरोप आव्हाडांनी केला होता. आजच्या प्रकारात हा वाद शारीरिक झटापटीपर्यंत गेला.
घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत विधानभवनाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “हल्लेखोरांचे पास कुणी दिले? आमदारच सुरक्षित नाहीत तर आमदारकीचा अर्थ काय?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. "मला कुत्रा, डुक्कर असे अपशब्द वापरत धमकावले गेले," असा आरोप करत त्यांनी पडळकरांवर गुंड प्रवृत्तीचा ठपका ठेवला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या घटनेवर संताप व्यक्त करत, "हे गुंड आहेत की समर्थक? सुरक्षा व्यवस्था फसली कशी? यावर गृहमंत्र्यांनी तातडीने कारवाई केली पाहिजे," अशी ठाम भूमिका मांडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे म्हणत, "अध्यक्षांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी व संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी," अशी विनंती केली.
अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात ही धक्कादायक घटना घडल्याने विधिमंडळ परिसरात चिंता आणि अस्वस्थता पसरली आहे. कायदा-सुव्यवस्थेवर आणि लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्न उभा राहिल्याचे चित्र सध्या दिसत आहे.