yuva MAharashtra आषाढी वारीत सांगली एसटी विभागाला भाविकांकडून भरघोस प्रतिसाद, उत्पन्नात वाढ

आषाढी वारीत सांगली एसटी विभागाला भाविकांकडून भरघोस प्रतिसाद, उत्पन्नात वाढ

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. १२ जुलै २०२५

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभागाने विशेष नियोजन करत वारकऱ्यांच्या सेवेसाठी अतिरिक्त बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली. या सेवेला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे विभागाने यंदा तब्बल ८०.८४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही रक्कम ४.४० लाखांनी अधिक असून, भाविकांचा विश्वास आणि उत्स्फूर्त सहभाग यामुळे सांगली विभागाची ही कामगिरी उठून दिसत आहे.

यंदा १ ते ८ जुलैदरम्यान, सांगली विभागाने आषाढी वारीच्या निमित्ताने ४०० विशेष बससेवा राबवून ८६० फेऱ्या घेतल्या. यामध्ये जवळपास १.४९ लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यात आला. ही व्यापक वाहतूक योजना अत्यंत यशस्वी ठरली.

मागील वर्षी ३८० बसद्वारे ७६.७३ लाखांचे उत्पन्न नोंदवले गेले होते, तर यंदा वाढीव बससेवा व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास व महिलांना अर्ध दरात तिकीट यासारख्या सवलतींचाही महसूल वाढीस सकारात्मक फायदा झाला.
आगार बसेस उत्पन्न

सांगली ५० ₹ 8,43,783
मिरज ४७ ₹ 7,87,005
इस्लामपूर ४३ ₹ 9,65,218
तासगाव ६० ₹9,99,096
विटा २६ ₹5,37,453
जत २४ ₹5,09,270
आटपाडी ४७ ₹13,27,978
कवठेमहांकाळ ३२ ₹5,62,062
शिराळा ३८ ₹7,31,835
पलूस ३१ ₹8,17,920

यात्रेच्या काळात आलेल्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवरही एसटीने सुरक्षित, वेळेत व सुयोग्य सेवा पुरवली. वारकऱ्यांच्या मोठ्या प्रतिसादामुळे महसुलात झालेली वाढ ही जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे सांगली विभागाचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी नमूद केले.