| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. १२ जुलै २०२५
तासगाव तालुक्यातील वडगाव येथे आमदार रोहित पाटील यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह वादळी पोस्ट व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात विजय जालिंदर पाटील या स्थानिक तरुणाविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विजय पाटील याने आपल्या फेसबुक खात्यावर आमदार रोहित पाटील यांच्याविषयी असभ्य आणि अपमानास्पद मजकूर प्रसारित केला. यामुळे आमदारांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले. या घटनेनंतर पक्षाच्या सुमारे पन्नास कार्यकर्त्यांनी तासगाव पोलिस ठाण्यावर धडक दिली आणि तातडीने कारवाईची मागणी केली.
या संदर्भात हातनूर येथील सचिन काशिनाथ पाटील यांनी विजय पाटीलविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर तासगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत विजयला ताब्यात घेतले. मात्र, पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्याला समज देऊन सोडण्यात आले आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील अशा प्रकारच्या पोस्ट्सबाबत अधिक सतर्कता बाळगली जात आहे. लोकप्रतिनिधींबाबत सोशल मीडियावर अश्लील, अपमानास्पद किंवा खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.