| सांगली समाचार वृत्त |
सातारा - रविवार दि. १३ जुलै २०२५
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या बारा गडकिल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. या ऐतिहासिक घडामोडीत सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाचा समावेश झाला असून, जिल्ह्याच्या गौरवात मोठी भर पडली आहे. या ऐतिहासिक क्षणाबद्दल पर्यटन मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी समाधान व्यक्त केले.
या ऐतिहासिक घोषणेनंतर पोवई नाका येथील शिवतीर्थ परिसरात शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक लेझीम, पोवाडे, आणि साहसी खेळांनी या उत्सवाला रंगत आणली. संपूर्ण परिसर भगव्या पताकांनी सजवण्यात आला होता.
या वेळी मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांचीही उपस्थिती होती.
पालकमंत्री देसाई यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून राज्य आणि केंद्र शासनाने संयुक्तपणे या यादीत समावेशासाठी प्रयत्न केले. यामध्ये सांस्कृतिक कार्य विभागाची भूमिका मोलाची ठरली. भारत सरकारच्या पाठपुराव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या किल्ल्यांना मान्यता मिळाली.
प्रतापगडाचा समावेश झाल्यामुळे आता तो जागतिक पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. गडकिल्ल्यांचे जतन आणि पर्यटन विकासासाठी ‘फोर्ट टुरिझम सर्किट’ राबवण्यात येत असून, त्यात शिवनेरी, रायगड, सिंहगड, प्रतापगड, अजिंक्यतारा आणि पन्हाळा या किल्ल्यांचा समावेश आहे.छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, हे यश केवळ महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव नसून, तो जागतिक इतिहासप्रेमींना प्रेरणा देणारा आहे. या निर्णयामुळे महाराजांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या यशानंतर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्रमाचे चित्रीकरण दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या व्हिडिओंना जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष प्रशंसा केली.