| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - बुधवार दि. २ जुलै २०२५
राज्यातील वीज ग्राहकांसाठी डिजिटल क्रांतीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार करत महावितरणकडून आतापर्यंत तब्बल ३२.२३ लाख घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. राज्यात एकूण २ कोटी २४ लाखाहून अधिक वीज ग्राहक असून, उर्वरित ग्राहकांसाठी मीटर बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. या मीटरद्वारे वापराचे अचूक मोजमाप करत थेट बिलिंग सुलभ होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती देताना सांगितले की, हे स्मार्ट मीटर सध्या पोस्टपेड स्वरूपात कार्यरत असून, ग्राहकांनी वापर केलेल्या विजेच्या प्रमाणावर बिल दिले जाते. अत्यल्प अपवाद वगळता, बहुतेक वेळा मोजणी अचूक असून, चुकीच्या बिलांची तात्काळ दुरुस्ती केली जाते.
राज्यातील उच्चदाब व लघुदाब अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांना हे मीटर बसविले जात आहेत. याचबरोबर २८ हजार वाहिन्या व १.४० लाख रोहित्रे यांनाही स्मार्ट यंत्रणेत जोडले गेले आहे.
दरम्यान, काही गावांमध्ये स्मार्ट मीटरविषयी आक्षेप नोंदवले गेले आहेत. सांगली जिल्ह्यातील तडसर, खेराडे व ठाण्याच्या कल्याण भागातील ग्रामस्थांनी प्रीपेड मीटरविषयी आपली अस्वस्थता व्यक्त करत याबाबत ग्रामपंचायत ठराव सादर केला आहे. यावर सरकारने स्पष्ट केले आहे की, सद्यस्थितीत प्रीपेड नव्हे तर केवळ पोस्टपेड मीटरच बसविले जात आहेत.
महावितरणच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत ही प्रक्रिया पार पडत असून, डिजिटल व पारदर्शक वीज वितरणासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.