| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १ जुलै २०२५
नांद्रे गावातील एक उदात्त कृती समाजाला दीपस्तंभ ठरणारी ठरली आहे. जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष तसेच वीराचार्य आयटीआयचे चेअरमन श्री. अरुण पाटील यांच्या भगिनी, सौ. प्रेमला अण्णा पाटील (वय ६९) यांचे ३० जून २०२५ रोजी अल्प आजाराने निधन झाले. या दु:खद घटनेनंतर पाटील कुटुंबीयांनी एक अत्यंत संवेदनशील आणि मोलाचा निर्णय घेतला — नेत्रदानाचा.
डॉ. अमोल सकाळे व डॉ. प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनच्या सांगली जिल्हा समन्वयक डॉ. हेमा शितल चौधरी यांच्याशी त्वरित संपर्क साधण्यात आला. त्यानंतर ताराबाई परांजपे आय बँकेचे डॉ. गौरव परांजपे यांनी हे नेत्रदान यशस्वीरीत्या स्वीकारले.या पुण्यकार्यामध्ये श्री. अरुण पाटील, श्री. धन्यकुमार पाटील आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचे संयम, धैर्य आणि सामाजिक जाणीव ठळकपणे दिसून आली. अंतिम क्षणी घेतलेला हा निर्णय दोन अंध व्यक्तींसाठी नवजीवनाची संधी ठरणार आहे.
"अशा संवेदनशील क्षणी नेत्रदानास संमती देणे ही सामान्य गोष्ट नाही. पाटील कुटुंबीयांचा हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायक आहे," असे गौरवोद्गार डॉ. हेमा चौधरी, जिल्हा समन्वयक, दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांनी व्यक्त केले.
या नेत्रदानाच्या माध्यमातून जिवंत असतानाही माणूस दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश टाकू शकतो, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. पाटील कुटुंबीयांनी दाखवलेला हा आदर्श भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल, यात शंका नाही.