yuva MAharashtra ट्रॉली विक्रीप्रकरणी चौकशीचे निर्देश; दोषींवर कठोर कारवाईचे जिल्हा पोलीस प्रमुखांकडून आश्वासन

ट्रॉली विक्रीप्रकरणी चौकशीचे निर्देश; दोषींवर कठोर कारवाईचे जिल्हा पोलीस प्रमुखांकडून आश्वासन

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १ जुलै २०२५

कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारातून रहस्यमयरीत्या गायब झालेल्या ट्रॉली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल, असा ठाम शब्द सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला. कवठेमहांकाळ येथील काही पत्रकारांच्या भेटीदरम्यान ते बोलत होते.

या प्रकरणात पोलिस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याने वरिष्ठ पातळीवरही अस्वस्थता व्यक्त केली जात आहे. सदर प्रकरणाचा प्राथमिक अहवाल दोन-तीन दिवसांत प्राप्त होणार असून, त्यानंतर संबंधितांवर शंभर टक्के कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास घुगे यांनी दिला.

शिरढोण येथील रहिवासी जितेंद्र मंडले यांच्या ट्रॅक्टरसह ट्रॉलीवर सन २०२२ मध्ये महसूल विभागाने कारवाई करून ती कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आली होती. मात्र, अलीकडच्या काळात ट्रॉली अचानक अदृश्य झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अधिकाऱ्यांकडे चौकशी सुरू केली. सुरुवातीला अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली, मात्र नंतर त्यांनी खासगी तपास सुरू केला असता ट्रॉली पांडेगावमध्ये एका नागरिकाकडे असल्याचे निष्पन्न झाले.

विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीने ही ट्रॉली पोलीस कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्याच्या मदतीने ५० हजार रुपये देऊन खरेदी केल्याची कबुली दिल्याचे मंडले यांनी स्पष्ट केले. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केल्यानंतर ट्रॉली पुन्हा पोलीस ठाण्यात आणली गेली.

मंडले यांनी याप्रकरणी स्पष्ट इशारा दिला असून, आरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास येत्या ७ जुलैपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. तसेच, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी नमूद केले असून, संरक्षणाची मागणी केली आहे.