| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १ जुलै २०२५
शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने एक सकारात्मक आणि नियोजनबद्ध पाऊल उचलले आहे. ‘नो हॉकर झोन’ आणि ‘हॉकर झोन’ अशा दोन विभागांमध्ये शहर विभागले जाणार असून, यामुळे वाहतुकीचा अडथळा कमी होईल आणि पादचाऱ्यांसाठी रस्ते मोकळे राहतील.
महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या नव्या धोरणाची रूपरेषा ठरवण्यात आली. शहरातील सुमारे ३८३९ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यांचे टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक प्रभागात स्वच्छ, सुसज्ज आणि सुरक्षित जागा निश्चित करून त्याठिकाणी फेरीवाल्यांना बसवले जाणार आहे.
सहा आयुक्त सहदेव कावडे, सचिन सांगावकर आणि अनिस मुल्ला यांनी प्रस्तावित ठिकाणांची माहिती सादर केली. यासोबतच नो हॉकर झोन बाबतही निश्चिती केली जाणार असून, त्यासंदर्भात जनजागृती मोहीम राबवली जाईल. नागरिकांचे हित लक्षात घेऊन हे धोरण आकार घेत असून, सार्वजनिक व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे.
उप आयुक्त स्मृती पाटील यांनी स्पष्ट केले की, फेरीवाल्यांना त्यांच्या उपजीविकेचा हक्क अबाधित ठेवून, शहरात शिस्तबद्धपणे त्यांचे व्यवस्थापन केले जाईल. शहर अभियंता, नगररचनाकार, मालमता अधिकाऱ्यांसह विविध अधिकाऱ्यांनी या कामात सक्रीय सहभाग घेतला.
बैठकीत समिती सदस्यांनी प्रशासनाच्या प्रस्तावाचे स्वागत केले असून, पुनर्वसनाच्या संभाव्य जागांची प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम निर्णय घेण्यावर भर देण्यात आला. आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले की, ठरवलेल्या धोरणाचे काटेकोर पालन झाले पाहिजे, अन्यथा कारवाई केली जाईल.
पुढील बैठक ३ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आली असून, त्यात अंतिम धोरणावर शिक्कामोर्तब होणार आहे. शहरातील फेरीवाल्यांच्या व्यवस्थापनासाठी हा टप्पा एक निर्णायक वळण ठरणार आहे.