| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शुक्रवार दि. १८ जुलै २०२५
सांगली बाजार समिती परिसरातील एका साखर पुरवठादाराने कल्याणमधील घाऊक व्यापाऱ्याची तब्बल २४ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कल्याणच्या दूधनाका भागात राहणाऱ्या दानिश निजाम सैय्यद (वय ३१) यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
दानिश सैय्यद हे साखर घाऊक व्यापारात कार्यरत असून त्यांनी मार्च महिन्यात सांगलीच्या मार्केट यार्डमधील एका व्यापाऱ्याकडे साखरेची ५० टन मागणी नोंदवली होती. यासाठी सुरुवातीला १६ लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने ‘गणेश शुगर्स’च्या बँक खात्यावर पाठवण्यात आले. यानंतर दुसऱ्या टप्प्यात ८ लाख २५ हजारांची दुसरी आगाऊ रक्कम देखील देण्यात आली. एकूण २४.२५ लाखांची रक्कम दिल्यानंतरही साखरेचा पुरवठा मात्र झालाच नाही.
पाच महिने उलटून गेले तरी व्यापाऱ्याने ना साखर पाठवली, ना पैसे परत केले. यासंदर्भात अनेक वेळा पाठपुरावा करूनही सांगलीतील पुरवठादाराने विविध कारणे देत वेळ काढली. अखेर दानिश सैय्यद यांना दिलेले धनादेशही वटले नाहीत. बँक खात्यात निधीच नसल्यामुळे हे धनादेश अनुत्तीर्ण ठरले.
या प्रकरणात सैय्यद यांनी दिलेली रक्कमही परत मिळाली नाही आणि साखरेचा पुरवठाही न झाल्यामुळे त्यांनी पोलिसांत धाव घेतली. फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुळशीराम राठोड करत आहेत.