| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. २५ जुलै २०२५
सांगली महापालिकेच्या स्थायी समितीच्या गुरुवारी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शहरात अमली पदार्थांच्या विक्रीशी संबंधित 60 संशयित ठिकाणी सीसीटीव्ही आधारित देखरेख यंत्रणा उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत 4.94 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त सत्यम गांधी होते. अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख, राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, विजया यादव, अश्विनी पाटील, तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी या वेळी उपस्थित होते.
शहरातील कर्नाळ रोड व कोल्हापूर रोड या दोन प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे प्रभावित झालेल्या जलवाहिन्यांच्या स्थलांतरासाठी, तसेच कालबाह्य वितरण नळवाहिन्या पुनर्बांधणीसाठी 2.15 कोटी रुपयांचा वाढीव खर्च मंजूर करण्यात आला. खणभाग ते धनगर गल्ली चौकापर्यंतच्या जलवितरण प्रणालीतील जुन्या यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी ही निधी वापरण्यात येणार आहे.
याशिवाय, प्रभाग क्र. 9 मधील सि.स. नं. 6354/245 या खुल्या जागेत ‘आमदार सुधीर गाडगीळ क्रीडा प्रबोधिनी क्रीडांगण’ विकसित करण्यासाठी 28.59 लाख रुपये खर्चाची निविदा मागवण्यासही समितीने संमती दर्शवली आहे.
दरम्यान, कुपवाडमधील प्रभाग 2 मध्ये चर्मकार समाजासाठी असलेल्या स्मशानभूमीच्या विकासासाठी सादर झालेल्या 26.95 टक्के कमी दराच्या निविदेला मान्यता देऊन कामास गती देण्यात आली.
महापालिका प्रशासन सामाजिक सुरक्षा, नागरी सुविधा आणि क्रीडा विकास या तिन्ही अंगांचा समन्वय साधल्याचे स्पष्टपणे जाणवते. नागरी समस्यांवर सक्रिय उपाययोजना राबवण्यात सांगली महापालिका पुढाकार घेत आहे.