yuva MAharashtra वैभव साबळे प्रकरण: MPSC परीक्षेत खोटं अपंगत्व? लाच प्रकरणानंतर नवा आरोप गाजतोय!

वैभव साबळे प्रकरण: MPSC परीक्षेत खोटं अपंगत्व? लाच प्रकरणानंतर नवा आरोप गाजतोय!


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १० जून २०२५ 

सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रातील एका २४ मजली इमारतीच्या परवान्यासाठी तब्बल ७ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात मोठा भडका उडाला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) सांगली शाखेने महत्त्वपूर्ण कारवाई करत उपायुक्त वैभव विजय साबळे यांना अटक केली आहे. यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

मात्र हे प्रकरण शांत होण्याआधीच आता साबळेंविरोधात आणखी गंभीर आरोप समोर आले आहेत. आप पार्टीचे राज्य उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक ट्विट करत थेट MPSC परीक्षेतील संभाव्य फसवणुकीकडे लक्ष वेधले आहे.

त्यांनी आरोप केला आहे की, वैभव साबळे यांनी "कर्णबधिर" असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून MPSC परीक्षा पास केली. विशेष म्हणजे, साबळे यांचा जन्म ज्या दिवशी झाला, त्या दिवशीच त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाले, ही बाबच संशयास्पद आहे. हा प्रकार अगदी पूजा खेडकर प्रकरणासारखाच असल्याचेही ते म्हणाले.

कुंभार यांनी असा दावा केला की, पूजा खेडकर प्रकरण उघडकीस आल्यानंतरच साबळे यांनी श्रवणयंत्र वापरणे सुरू केले, त्याआधी कधीही त्यांचा अशा कोणत्याही यंत्राचा वापर नव्हता. एवढं असूनही प्रशासकीय यंत्रणांकडून कोणतीच चौकशी किंवा कारवाई झाली नाही, हे अधिक धक्कादायक आहे.


ते पुढे म्हणतात, “आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की फसव्या मार्गाने सेवा मिळवलेले अधिकारी प्रामाणिक सेवा करूच शकत नाहीत. हे अधिकारी खुर्चीचा गैरवापर करत, लोकांचा छळ करत आणि लाच घेत आपली बोगस पात्रता लपवण्याचा प्रयत्न करत असतात.”

या प्रकरणामुळे प्रशासनात चाललेली फसवणूक, अपंगत्वाच्या फायद्यांची बेकायदेशीर लूट आणि व्यवस्था किती सडलेली आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. केवळ कर्णबधिर नव्हे, तर ही संपूर्ण यंत्रणाच आता मूक, अंध आणि दुर्बुद्ध झाली आहे, असं म्हणावं लागेल !