| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - सोमवार दि. ३० जून २०२५
राज्याच्या प्रशासकीय नेतृत्वात मोठा बदल होत असून, ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेशकुमार मीना यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. सध्या महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या मीना हे 30 जून रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे कार्यकाल समाप्त होत असल्याने, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीकडे संपूर्ण मंत्रालयाचे लक्ष लागले होते. अखेर वरिष्ठतेचा व प्रशासकीय अनुभवाचा विचार करून मीना यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
1988 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेले मीना हे आगामी ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त होणार असून, त्यांना अवघे दोन महिने पदावर राहता येईल. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यास, त्यांच्या कार्यकाळात मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही निवडणूक काळात काही मुख्य सचिवांना अशाच पद्धतीने मुदतवाढ मिळाल्याचे उदाहरणे आहेत.
या पदासाठी इकबालसिंह चहल आणि भूषण गगराणी यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, अनुभवी आणि प्रशासनातील सर्वाधिक ज्येष्ठ अधिकारी असल्यामुळे, मीना यांनाच अंतिम संधी देण्यात आली. विविध खात्यांमध्ये प्रभावी कारभार केलेल्या मीना यांच्याकडे राज्य प्रशासनाला योग्य दिशा देण्याचा भरवसा व्यक्त करण्यात येतो.
राज्याच्या प्रमुख प्रशासकीय पदासाठी नेमणूक करण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून, त्यांनी अनुभव, ज्येष्ठता आणि प्रशासकीय गरज यांचा समतोल साधत राजेशकुमार मीना यांची निवड केली आहे.