| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शनिवार दि. २१ जून २०२५
महाराष्ट्र शासनाकडून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. जून महिन्याच्या पगारात आता दोन्ही घटकांना आर्थिक लाभ मिळणार आहेत.
राज्य सरकारने अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला असून, यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण दिसून येत आहेत. नुकतेच सरकारने दोन महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर अंतिम निर्णय घेतला आहे.
१०४ पदांना सुधारित वेतनश्रेणी
खुल्लर समितीने शिफारस केलेल्या १०४ पदांना सुधारित वेतनश्रेणी देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या वेतनात याचा थेट फायदा होणार आहे. वेतनातील तफावत दूर करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली होती, आणि आता तिच्या शिफारशी अंमलात आणण्यात आल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत.
तथापि, ही सुधारणा २०१६ पासून लागू व्हावी आणि त्यासाठी थकबाकीही द्यावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी असली तरी सरकारने थकबाकीबाबत नकार दर्शवला आहे.
महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता
सध्या राज्य कर्मचाऱ्यांना ५३% दराने महागाई भत्ता मिळतो आहे. पण, केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना ५५% दराने महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्य सरकारनेही त्याच धर्तीवर महागाई भत्ता वाढवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. वित्त विभागाने तयार केलेला प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सादर झाला असून, लवकरच शासन निर्णय अपेक्षित आहे.
ही वाढ जानेवारी २०२५ पासून लागू राहील, त्यामुळे जुन पगारात वाढीबरोबरच मागील महिन्यांचा फरकही मिळण्याची शक्यता आहे. एकूणच राज्य शासनाच्या या निर्णयांमुळे कर्मचारी आणि पेन्शनधारक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिकदृष्ट्या थोडा दिलासा देणारा हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे.