फोटो सौजन्य: Wikimedia commons
| सांगली समाचार वृत्त |
पुरी - शनिवार दि. २८ जून २०२५
पुरीच्या जगन्नाथ रथ यात्रेला सुरुवात होताच, श्रद्धेच्या लाटेने शहर भरून गेलं. रथ ओढण्यासाठी आलेल्या हजारो भाविकांच्या गर्दीचा काही वेळातच ताण निर्माण झाला आणि गोंधळाची स्थिती उद्भवली. काही भाविकांना श्वास घेणंही कठीण झालं, तर काहीजण बेशुद्ध अवस्थेत कोसळले. या गोंधळात सुमारे ५०० लोक जखमी झाले असून, आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेनंतर तातडीने वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झालं आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांकडून उपचार सुरू असून, परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे.
प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, रथयात्रेचा प्रारंभ झाल्याच्या दिवशीच ही अडचण येणं दुर्दैवी आहे. अत्यवस्थ भाविकांची काळजी घेण्यासाठी रथयात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली असून, उद्या ती पुढे सुरू होईल.
सामान्यतः अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध मानली जाणारी ही यात्रा यंदा अनपेक्षित अडचणीत सापडल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. मात्र, भक्तांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सतर्क असून, पुढील टप्प्यात अधिक काळजी घेण्यात येणार आहे. सुदर्शन पटनायक यांनी सांगितलं की, महाप्रभू जगन्नाथ रथ यात्रेला आजच सुरुवात झाली आणि आजच रथ रोखण्याची नामुष्की ओढवली. उद्या पुन्हा हे रथ मावशीच्या घरापर्यंत ओढले जाणार आहेत. काही लोकांना आश्चर्य वाटलं की रथ का रोखण्यात आले.