yuva MAharashtra "अपक्ष खासदार म्हणजे सर्वसत्ताधीश नव्हे!" — चंद्रकांत पाटील यांची सडकून टीका

"अपक्ष खासदार म्हणजे सर्वसत्ताधीश नव्हे!" — चंद्रकांत पाटील यांची सडकून टीका


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. २८ जून २०२५

"खासदारकी मिळाल्यावर काहीजण स्वतःला राजा समजू लागतात," अशा शब्दांत भाजप नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. कोणत्याही विषयावर बेधडक मतप्रदर्शन करणाऱ्या पाटील यांना लक्ष्य करत त्यांनी स्पष्ट संदेश दिला की, निवडणुकीतील यश म्हणजे अचूकता आणि नेतृत्व सिद्ध झालं, याचा पुरावा नाही.

विशाल पाटील यांचे यंदाचे यश हे निव्वळ बदललेल्या राजकीय समीकरणांचे फलित असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सूचित केले. “2019 मध्ये ते अपयशी ठरले, हे विसरून चालणार नाही,” असं सांगत त्यांनी या विजयानंतर आलेल्या आत्ममुग्धतेवरही टोला लगावला.
जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत विशाल पाटील यांनी व्यक्त केलेल्या संशयावरही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. “त्या स्वतः निर्णय घेणाऱ्या नेत्याच आहेत, कोणाच्या दबावाखाली नाही. काँग्रेसने त्यांना दूर केलं आणि त्यांची उमेदवारीही नाकारली. त्यामुळे त्यांनी भाजपचा विचार केला,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

सत्तासंकेत मिळताच स्वतःला शहाणं समजणं आणि इतरांवर संशय घेणं, यावर चंद्रकांत पाटील यांनी खंत व्यक्त केली. राजकारणात भूमिका बदलत असतात, आणि तसंच यावेळीही घडलं, हे त्यांनी ठामपणे मांडलं.