yuva MAharashtra "नशामुक्त भारतासाठी तरुणांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा" – सयाजी शिंदे यांचे आवाहन

"नशामुक्त भारतासाठी तरुणांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा" – सयाजी शिंदे यांचे आवाहन


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - शनिवार दि. ७ जून २०२५

भावी पिढी केवळ जबाबदार नागरिकच नव्हे, तर आरोग्यदृष्ट्याही सक्षम बनावी, यासाठी सुरू असलेल्या नशामुक्त मोहिमेत युवकांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने नशेच्या साखळीवर प्रहार करत विशेष मोहीम हाती घेतली असून, या स्तुत्य उपक्रमाचे राज्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही कौतुक केले आहे.

या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे यांनी मिरज पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी प्रभारी सहायक निरीक्षक सतीश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामगिरीचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

सामाजिक भान ठेवत पर्यावरण संवर्धनाचा संदेशही त्यांनी दिला. पोलीस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण करत त्यांनी पर्यावरण रक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. 'माझी मुलगी, माझा अभिमान' या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकारी श्री. शिंदे यांची व त्यांच्या मुलगी तनिष्का हिची विशेष प्रशंसा केली.


यानंतर अभिनेते शिंदे यांनी मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयास भेट दिली. येथे गरीब रुग्णांसाठी होत असलेल्या वैद्यकीय सेवा मोलाच्या ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. मॉड्युलर अतिदक्षता विभाग तसेच शस्त्रक्रियागृहांची पाहणी करत त्यांनी समाधान व्यक्त केले.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांनी रुग्णालयात मिळणाऱ्या आरोग्य सेवांची माहिती दिली. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रुग्णालयात वृक्षारोपणाचा उपक्रमही राबविण्यात आला. यावेळी डॉ. प्रकाश गुरव, निवासी डॉक्टर, परिचारिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे, या रुग्णालयाच्या वतीने दुष्काळी भागासाठी हजार झाडे वितरित करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. शिंदे यांनी दिली.