| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. २१ जून २०२५
सांगली : वसंतदादा पाटील यांची सून आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सोबत काही प्रमुख कार्यकर्तेही भाजपच्या वाटेवर गेले असले, तरी मदनभाऊ गटातील काही महत्त्वाच्या नेत्यांनी मात्र हा निर्णय मान्य न करत भाजपप्रवेशास नकार दिला आहे. त्यामुळे गटात मतभेद उफाळून आले आहेत.
मिरज, कुपवाड व सांगली भागात माजी मंत्री मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मजबूत संघटन उभे राहिले होते. विविध समाजघटकांतील कार्यकर्ते या गटाशी जोडले गेले होते. त्यांच्या निधनानंतर जयश्रीताईंच्या नेतृत्वात ही चळवळ सुरू होती. त्यांच्या भाजपप्रवेशाबाबत अनेक कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र भावना होत्या. काहींनी हा निर्णय स्वागतार्ह मानला, तर काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ही अधिक योग्य वाट असल्याची भूमिका घेतली.
अजित पवार हे महायुतीतील उपमुख्यमंत्री असून, त्यांच्याशी राहिल्यास राजकीय पाठबळासोबतच वसुलीप्रकरणांसारख्या विषयांवरही मदत मिळू शकते, असे काही कार्यकर्त्यांचे मत होते. मात्र, गटातील वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. सिकंदर जमादार, माजी नगरसेवक फिरोज पठाण, तौफिक शिकलगार, कय्युम पटवेगार आणि युनूस महात यांनी भाजपप्रवेश टाळला आहे. "जयश्रीताई भाजपमध्ये गेल्या, पण आमचा गट त्यांच्या पाठोपाठ गेला नाही. आता कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार," असे डॉ. सिकंदर जमादार यांनी स्पष्ट केले आहे.