yuva MAharashtra सांगलीत खाजगी रुग्णालयात वंचित बहुजन आघाडीची तोडफोड

सांगलीत खाजगी रुग्णालयात वंचित बहुजन आघाडीची तोडफोड


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. ४ जून २०२५

सांगली शहरातील विश्रामबाग चौकात असलेल्या 'आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल'मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत तोडफोड केल्याची घटना घडली. ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि बांधकाम कामगार आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून रुग्णालय प्रशासन अतिरिक्त पैसे घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांनी ही बाब उचलून धरली. त्यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये घुसून तीव्र घोषणाबाजी करत काचा आणि उपकरणांची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत काही आंदोलकांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.


या संदर्भात रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले आहेत. 'शासकीय योजनेअंतर्गत रुग्णांना पूर्णपणे मोफत सेवा पुरविल्या जात आहेत, आणि कुठल्याही रुग्णाकडून जादा पैसे घेण्यात आलेले नाहीत,' असे स्पष्टीकरण हॉस्पिटलचे डॉ. शरद सावंत यांनी दिले. तसेच, रुग्णालयात घडलेली तोडफोड पूर्वनियोजित असून, यामागे हेतुपूरस्सर कट असल्याचाही दावा त्यांनी केला.

सध्या या प्रकरणाची चौकशी पोलीस यंत्रणा करत असून, दोन्ही बाजूंचे म्हणणे लक्षात घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.