| सांगली समाचार वृत्त |
जत - बुधवार दि. ४ जून २०२५
चिंचणी वांगी, इस्लामपूर आणि आटपाडी परिसरात बंद दुकाने, बंद घरांची कुलपे तोडून चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली. चोरीतील सोने चांदी विक्रीसाठी जात असताना सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याचांदीचे दागिने, चारचाकी गाडीसह २६ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अटक केलेल्या पैकी एकावर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
संतोष तुळशीराम चव्हाण, (वय ४२) आशुतोष संतोष चव्हाण, (वय २१, दोघेही रा. एकता नगर, सातारा रोड, जत ), करण अर्जुन चव्हाण (वय १९, रा. होनसळ, जि सोलापूर), पांडुरंग सुनिल पवार (वय २६, रा. होटगी, जि. सोलापूर ) या चौघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहीती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतिश शिदे यांच्या आदेशानुसार कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकास जत परिसरात चोरीतील माल विक्रीसाठी काही चोरटे येणार असल्याची माहीती मिळाली.
पथकामधील पोलिस अंमलदार प्रमोद साखरपे, हवालदार हणमंत लोहार, पोलिस नाईक सोमनाथ गुंडे यांना मिळालेल्या माहितीनुसार जत ते कवठेमहांकाळ रोडवर असलेल्या जाधव वस्ती येथील रज्जाक नगारजी यांच्या बंद असलेल्या हॉटेल सानिया गार्डन येथे सापळा लावला. त्या ठिकाणी काही वेळातच
संतोष चव्हाण, त्यांचा मुलगा आशुतोष तसेच करण चव्हाण व पांडुरंग पवार असे चौघेजण एका पांढ-या रंगाच्या चारचाकी गाडीतून तेथे आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्धन व पथकाने त्या गाडीजवळ जावून गाडीतील चौघांनाही पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांच्यासह गाडीची तपासणी केली असता गाडीच्या मधल्या सीटच्या खाली एका कापडी - पिशवीमध्ये सोन्याचे व चांदीचे दागिने व गाडीचे मागील बाजूस सीटखाली कापडी पिशवीमध्ये स्टीलची पाईप, कटावणी, चाकू, पाना, स्कू ड्रायव्हर, बॅटरी, मास्क, हॅन्डग्लोज इत्यादी साहित्य मिळून आले. सदर मालाबाबत विचारणा केली असता, त्यांनी गेल्या काही महिन्यात जत, विटा, इस्लामपूर, चिंचणी वांगी व आटपाडी परिसरात बंद घरे तसेच दुकान फोडून घरफोडी चोरी केली असून त्या गुन्हयातील चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी घेऊन जात असलेबाबत कबुली दिली.
चारही चोरट्यांना पुढील तपास कामी जत पोलीसाकडे वर्ग करण्यात आले आहे. चोरटा संतोष तुळशीराम चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जत पोलीस ठाणे व कर्नाटक राज्यात घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या कामात त्याचा मुलगा आशुतोषही आता सहभागी होत आहे.