| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ३ जून २०२५
कर्नाटकमधील कृष्णा नदीवर उभारलेल्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. या मुद्द्यावर त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.
कर्नाटकचे जलसंपदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, कृष्णा जल विवाद न्यायाधिकरणाच्या निर्णयानुसार धरणाची उंची ५१९ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याचा अधिकार कर्नाटकाला आहे. मात्र, फडणवीस यांनी आपल्या पत्रात ही उंची वाढवल्यास महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना संभाव्य पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका मांडली आहे.
शिवकुमार यांनी या विरोधावर आश्चर्य व्यक्त करत सांगितले की, "२०१० मध्ये न्यायाधिकरणाने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्राने यावर कधीच विरोध केला नव्हता. आता अचानक आक्षेप घेतला जात आहे, हे धक्कादायक आहे."
शेजारील राज्यांशी वाद नको असल्याचे स्पष्ट करत शिवकुमार म्हणाले की, धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय हा कर्नाटकच्या हक्काचा भाग आहे. त्यांनी पुढे सांगितले, "महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती ही त्यांच्या अंतर्गत कारभाराशी संबंधित बाब आहे. त्यामुळे कर्नाटकाने आपला अधिकार वापरू नये, असे सांगणे योग्य नाही."
या मुद्द्यावर केंद्र सरकारकडे लक्ष वेधण्यासाठी लवकरच पंतप्रधान व केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. तसेच राज्यातील केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी याबाबत केंद्रावर दबाव टाकून कर्नाटकच्या हिताचे रक्षण करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.