yuva MAharashtra सांगलीत मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष कार्यरत; पावसाळी स्थितीवर २४x७ लक्ष

सांगलीत मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष कार्यरत; पावसाळी स्थितीवर २४x७ लक्ष


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. ४ जून २०२५


पूरस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेता सांगली पाटबंधारे विभागांतर्गत मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, याचे उद्घाटन कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी उपविभागीय अभियंते दयानंद बगली, योगिता थोरात, सहाय्यक अभियंता श्वेता दबडे-पाटील तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता देवकर यांनी कक्षाच्या सुरळीत सुरू असलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. क्षेत्रीय पातळीवरून जलपातळीचा अहवाल नियमितपणे पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक करत, यावर्षीही पूरनियंत्रण कार्य व्यवस्थित पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला.


या कक्षाचे कार्य 1 जून ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत अखंड सुरु राहणार असून, नागरिकांनी आवश्यकतेनुसार 0233-2301820 किंवा 0233-2302925 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येकवर्षी 1 जूनपासून कार्यान्वित होणारा हा कक्ष यंदा मे महिन्याच्या अखेरीसच सुरु करण्यात आला आहे, कारण यावर्षी पावसाला लवकर सुरुवात झाली. 26 मेपासून सुरू झालेल्या या कक्षात एकूण 126 कर्मचारी कार्यरत असून, २४ तास सातत्याने सेवा देण्यात येणार असल्याचे देवकर यांनी सांगितले.