| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. २१ जून २०२५
सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील बंडखोर नेत्या आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत नवीन राजकीय समीकरणांना चालना दिली आहे. राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चा असतानाही त्यांनी भाजपचा पर्याय निवडला. कार्यकर्त्यांचा कल राष्ट्रवादीकडे असला तरी ताईंनी राजकीय हितसंबंधांचा विचार करत भाजपचा हात पकडला, असे स्पष्ट होते.
ताईंचा भाजपप्रवेश खासदार विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसमध्ये यापूर्वी गटबाजीमुळे विशाल पाटील कायम मागे पडले होते. आता जयश्रीताईंच्या जाण्याने त्यांच्यासाठी काँग्रेसमध्ये एकहाती नेतृत्वाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. अर्थात, आमदार विश्वजीत कदम यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य होणार नाही.
जयश्रीताईंच्या भाजपप्रवेशामागचे सूत्रधार
जयश्रीताईंच्या भाजपप्रवेशामागे दोन महत्वाची कारणे सांगितली जात आहेत:
- 1. वसंतदादा शेतकरी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणातून मुक्तता – दिवंगत मदनभाऊ पाटील यांच्या वारसदारांवर जबाबदारी निश्चित झालेली असून, त्यातून कायदेशीर मार्गाने मुक्तता मिळवून देण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
- 2. महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा स्थानिक पाठिंबा वाढवण्याचे गणित – मदनभाऊंच्या गटाचे सांगली महापालिकेतील मुरब्बी कार्यकर्ते, विशेषतः मुस्लिम-दलित जनाधार असलेले, भाजपसाठी फायद्याचे ठरू शकतात.
काँग्रेससाठी नवसंधी
जयश्रीताई भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसमध्ये रिकामे झालेले स्थान आता विशाल पाटील भरू शकतात. गेल्या काही वर्षांत मदनभाऊंचा गट सतत वर्चस्व गाजवत होता. पण आता विशाल यांना संघटन बांधणीसाठी मोकळे वातावरण मिळू शकते. त्यांच्या पाठीशी वसंतदादा घराण्याचा आदर करणारा वर्ग आणि विश्वजीत कदम यांचा स्वतंत्र कार्यकर्ता वर्ग आहे. जातीय समीकरणांचा आधार मिळाल्यास काँग्रेस सांगली महापालिकेत चांगली ताकद उभारू शकते.
भाजपसमोरील आव्हाने
मदनभाऊंच्या गटातील अनेक मुस्लिम कार्यकर्ते भाजपप्रवेशास नकार देत असल्याने, हा घटक काँग्रेसकडे वळण्याची शक्यता आहे. अशावेळी विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मजबूत होईल, आणि भाजपसमोर थेट लढत उभी राहील.
जर शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी काँग्रेससोबत समन्वय ठेवल्यास, महाविकास आघाडी एकत्र येऊन भाजपसमोर मोठे आव्हान उभे करू शकते. याचसाठी विशाल पाटील सध्या समन्वय साधण्याच्या हालचाली करत आहेत.
जयश्रीताईंचा भाजपप्रवेश हा पक्षांतर एवढ्यापुरता मर्यादित नसून, तो सांगली जिल्ह्यातील आगामी राजकारणाचे नवसंघटन ठरू शकतो. भाजपने आपली भूमिका मजबुत करण्याचा डाव खेळलेला असला तरी काँग्रेससाठीही ही एक नवीन संधी ठरू शकते – फक्त योग्य रणनीती आखण्याची गरज आहे.