yuva MAharashtra जिल्हा बँकेच्या गार्डी शाखेत तब्बल 30 लाखांचा गैरव्यवहार; शाखाधिकारी निलंबित

जिल्हा बँकेच्या गार्डी शाखेत तब्बल 30 लाखांचा गैरव्यवहार; शाखाधिकारी निलंबित


फोटो सौजन्य : फेसबुक वॉलवरुन 

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. २१ जून २०२५

खानापूर तालुक्यातील गार्डी येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेत सरकारी अनुदान व व्याजाच्या रकमेतील सुमारे 30 लाख रुपयांचा अपहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शाखाधिकारी रघुनाथ धोंडिराम यादव यांना तातडीने निलंबित करण्यात आले असून, सेवानिवृत्त कर्मचारी धनराज रामचंद्र निकम याचाही सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांविरुद्ध सखोल चौकशी सुरू असून अंतिम अहवालानंतर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अपहार केलेली संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा बॅंकेतील विविध शाखांमध्ये शेतकऱ्यांच्या शासकीय अनुदानाशी संबंधित गैरव्यवहार समोर येत आहेत. अतिवृष्टी, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने जाहीर केलेले निधी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. मात्र, काही खात्यांमध्ये तांत्रिक अडचणी, अपूर्ण माहिती किंवा खाती नसल्यामुळे काही रक्कम बॅंकेतच अडकल्याचे आढळले आहे. याच रकमांवर काही कर्मचाऱ्यांनी संगनमताने हात साफ केल्याचे प्रकार समोर येत आहेत.


गार्डी शाखेतील घोटाळ्यात रघुनाथ यादव आणि धनराज निकम या दोघांनीच अनुदान व व्याजाच्या रकमेचा गैरवापर केल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. निकम हे दोन वर्षांपूर्वी शाखाधिकारी पदावरून निवृत्त झाले असून, त्यांच्या सेवाकाळात यादव लिपीक पदावर कार्यरत होते.

याप्रकरणी कठोर पावले उचलण्यात येत असून, निकम यांच्या बँकेत असलेल्या अंदाजे 40 लाख रुपयांच्या ठेवी गोठवण्यात आल्या आहेत. पुढील चौकशीच्या आधारे दोघांवरही गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.