yuva MAharashtra आषाढी वारीवरून अबू आझमी यांच्या वक्तव्याने खळबळ; फडणवीसांचा करारा जवाब

आषाढी वारीवरून अबू आझमी यांच्या वक्तव्याने खळबळ; फडणवीसांचा करारा जवाब


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - सोमवार दि. २३ जून २०२५

पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि भक्तीमय परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. हजारो वारकऱ्यांची टाळमृदुंगाच्या गजरात चालणारी ही वारी राज्यातील धार्मिक वातावरण अधिकच भाविक बनवते. मात्र, याच पवित्र परंपरेवर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

अबू आझमी यांनी नुकतेच पालख्या आणि आषाढी वारीच्या अनुषंगाने केलेले वक्तव्य अनेकांच्या भावना दुखावणारे ठरले आहे. पुण्याहून प्रवास करत असताना वारीमुळे रस्ता बंद असल्याचे सांगून त्यांनी टिप्पणी केली की, "कोणत्याही मुस्लिमाने आजपर्यंत सण-उत्सवांमुळे रस्ते अडवले जात असल्याची तक्रार केलेली नाही. पण मशिदीत जागा न मिळाल्यामुळे जर कोणी थोडा वेळ रस्त्यावर नमाज अदा करत असेल, तर त्यावर कडक पावले उचलली जातात. उत्तरप्रदेशात तर अशा कृतीसाठी पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची धमकी दिली जाते."


त्यांच्या या विधानाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयावर प्रतिक्रिया देताना आझमी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले, "अबू आझमी यांना वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धी मिळवायची सवय आहे. त्यामुळे अशा वक्तव्यांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही."

अबू आझमी यांच्या विधानावर विविध राजकीय पक्षांपासून ते समाजातील अनेक स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेल्या आषाढी वारीवर अशी टिप्पणी करणं अनुचित असल्याची एकंदरीत भावना व्यक्त होत आहे.