| सांगली समाचार वृत्त |
तेहरान - बुधवार दि. २५ जून २०२५
इराण आणि इस्त्रायल यांच्यात गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष अखेर थांबला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाल्याचे जाहीर केले होते. सुरुवातीला इराणने हा दावा फेटाळून लावत युद्धबंदी नाकारली होती. मात्र आता इराणने अधिकृतपणे युद्धबंदी मान्य करत संघर्ष समाप्त झाल्याचे आपल्या सरकारी माध्यमांतून जाहीर केले आहे.
इराणच्या घोषणा आल्यानंतर इस्रायलनेही आपल्या संरक्षण यंत्रणांचा सतर्कतेचा इशारा मागे घेत नागरिकांना सुरक्षीत बाहेर पडण्यास परवानगी दिली आहे. यामुळे दोन्ही देशांतील तणाव काहीसा निवळल्याचे दिसत आहे.
या युद्धाच्या दरम्यान इराणने शस्त्रसंधीच्या घोषणेनंतरही इस्रायलवर हल्ले सुरूच ठेवले होते. काही तासांत इराणकडून तीन वेळा क्षेपणास्त्र हल्ले झाले, ज्यात चार नागरिकांचा मृत्यू झाला होता. तेल अवीवमध्ये सायरन वाजवून नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सैन्याच्या धैर्याचे कौतुक करत इस्त्रायलला शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्युत्तर देण्यात आले, असे सांगितले. त्यांनी म्हटले की, इराणी सैन्य नेहमीच देशाच्या रक्षणासाठी सज्ज असते आणि त्यांनी आपल्या शौर्याने राष्ट्रसेवा बजावली.
इराणवर गंभीर परिणाम
१३ जूनपासून सुरू झालेल्या या युद्धात इराणला मोठा आर्थिक व मानवी तोटा सहन करावा लागला. अमेरिकेने फोर्डो, नतांज आणि इस्फहान येथील तीन महत्त्वाचे अणु केंद्र लक्ष्य करत बंकर बस्टर बॉम्बहल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी, काही वरिष्ठ सैन्याधिकारी आणि अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू झाला. एकूण सुमारे एक हजार जणांचा बळी गेला असून पायाभूत सुविधांचेही गंभीर नुकसान झाले. या संघर्षात इराण एकटाच राहिला. चीन आणि रशियाने केवळ नैतिक पाठिंबा दिला, पण थेट मदत किंवा हस्तक्षेप टाळला.