yuva MAharashtra अजितराव घोरपडे यांची रणनिती ठरली; कार्यकर्त्यांना 'घड्याळा'साठी सज्ज होण्याचे आदेश

अजितराव घोरपडे यांची रणनिती ठरली; कार्यकर्त्यांना 'घड्याळा'साठी सज्ज होण्याचे आदेश

फोटो सौजन्य : फेसबुक वॉलवरुन 

| सांगली समाचार वृत्त |
मिरज - मंगळवार दि. १० जून २०२५ 

माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी मिरजमध्ये शुक्रवारी घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे रणशिंग फुंकले आहे. ‘घड्याळ’ हेच चिन्ह ठरवून लढण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला असून, गावागावांत अजित पवार गट बळकट करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मिरज येथील बाजार समितीच्या सभागृहात सायंकाळी झालेल्या या बैठकीत कवठेमहांकाळ व मिरज पूर्व भागातील कार्यकर्त्यांचा सहभाग होता. यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांचा सत्कार नियोजित होता, मात्र अपरिहार्य कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. तथापि, आमदार इंद्रिस नायकवडी, पद्माकर जगदाळे आणि माजी नगराध्यक्षा साधना कांबळे यांची उपस्थिती या बैठकीस भार देणारी ठरली.

आपल्या भाषणात घोरपडे यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुकीसाठी तयार राहण्याचे स्पष्ट संकेत दिले. प्रत्येक गावात पक्ष शाखा स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले असून, पदाधिकाऱ्यांची आणि महिला आघाडीची निवडही लवकरच जाहीर केली जाईल, असे ते म्हणाले.


माजी मंत्री घोरपडे यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्याचे आदेश देत पक्षसंघटना बळकट करण्यावर भर दिला आहे. यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यासह मिरज पूर्व भागात निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

या बैठकीतून एक बाब निश्चित झाली – अजितराव घोरपडे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या 'घड्याळ' चिन्हावरच मैदानात उतरणार आहेत.