| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शुक्रवार दि. २० जून २०२५
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्य शासनाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवण्याच्या दिशेने सरकारने आता ९ टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत शासकीय महामंडळांच्या विविध कर्ज योजनांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसोबत जोडण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला. कर्जाच्या पुनर्भरणावर येणाऱ्या व्याजाचे भरण सरकारकडून करण्यात येणार असून, महिलांना व्यवसायासाठी भांडवली सहाय्य मिळेल.
या नव्या उपक्रमाअंतर्गत वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात कर्ज सुविधा उपलब्ध राहणार आहे. मुंबई बँक आणि राज्यातील विविध विकास महामंडळांमार्फत ही योजना संयुक्त स्वरूपात राबवली जाणार आहे.
या योजनेद्वारे महिला उद्योग सुरू करू शकतील, स्वावलंबी बनतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ, पर्यटन संचालनालय यांच्यासह इतर संस्थांच्या माध्यमातून हे कर्ज वाटप केले जाईल.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे महिलांच्या उद्यमशीलतेला नवे बळ मिळणार असून, त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक स्थानही अधिक बळकट होणार आहे.