| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. ७ जून २०२५
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढीतर्फे वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात आला. मात्र केवळ वृक्षारोपण न करता वृक्षांचे जतन आणि संवर्धन हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
सांगलीतील विश्रामबाग परिसरातील गायत्री नगर येथे या उपक्रमाची सुरुवात पीएनजीचे संचालक राजीवदादा गाडगीळ यांच्या हस्ते झाली. यावेळी परिसरातील अनेक नागरिकांसह रितेश जाधव, उमेश सहस्त्रबुद्धे, शरद करमुसे, रावसाहेब मदने, श्रीनिवास जरंडीकर यांची उपस्थिती होती. या उपक्रमाचे संयोजन पीएनजी विश्रामबाग शाखेच्या सहकार्याने करण्यात आले.
पीएनजीचा पर्यावरणपूरक पुढाकार
मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढी ही केवळ व्यावसायिक संस्था नसून, सामाजिक भान जपणारी संस्था म्हणून परिचित आहे. सात पिढ्यांचा व्यावसायिक वारसा असतानाही, समाजाप्रती जबाबदारीची जाण प्रत्येक पिढीने जपली आहे. पर्यावरण रक्षणाची गरज ओळखून पीएनजीने वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य दिले आहे.
औद्योगिकीकरण, जंगलतोड पर्यावरणावरील संकट
ग्लोबल वॉर्मिंग, औद्योगिकीकरण आणि झपाट्याने होत असलेली जंगलतोड यामुळे हवामानात असंतुलन निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम वन्यजीवांच्या अधिवासावर आणि मानवाच्या आरोग्यावर होत आहे. वृक्षतोडामुळे ऑक्सिजनचा नैसर्गिक स्रोत कमी झाला असून, त्यातून प्रदूषणातही वाढ झाली आहे. झाडे ही निसर्गाची फुफ्फुसे असून, ती हानिकारक वायूंना शोषून शुद्ध हवा निर्माण करतात.
"संवर्धनाशिवाय वृक्षारोपण अपूर्ण" – सिद्धार्थदादा गाडगीळ
पीएनजीचे संचालक सिद्धार्थदादा गाडगीळ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “वृक्षारोपण जितके आवश्यक आहे, तितकेच त्याचे संगोपनही महत्त्वाचे आहे. संवर्धन केल्यासच या झाडांमुळे भविष्यकाळातील पर्यावरण टिकून राहील.”
हरित सांगलीसाठी ट्री गार्ड व टँकर सेवा
सांगली शहरातील विविध भागांमध्ये वृक्ष लागवड उपक्रमांसाठी पीएनजीच्या वतीने ट्री गार्ड्स पुरवण्यात आले आहेत. लावलेल्या झाडांची चांगली वाढ व्हावी म्हणून स्वतंत्र टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आजपर्यंत १२०० पेक्षा अधिक झाडे लावून त्यांचे संगोपन यशस्वीरित्या करण्यात आले आहे.