| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - बुधवार दि. ४ जून २०२५
राज्य शासनाने काल महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया मधील काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला असून डिजिटल मीडियामधील चॅनेल्स व वेब पोर्टल्सना आता राजमान्यता देऊन त्यांना जाहिरात देण्याबाबत चे परिपत्रक दिनांक ३ जून रोजी अधिकृतरित्या जाहीर केले आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, यांच्या कुशल नेतृत्वाखालील पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष संतोष शिंदे व कार्यकारिणी सदस्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांना वारंवार भेटून डिजिटल मीडियाचे महत्व पटवून देत होते. गेली सहा वर्षे या मागणीसाठी शासन दरबारी अथक प्रयत्न करीत होते.
महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच ग्रामीण भागापासून मेट्रो सिटी पर्यंत विस्तृत जाळे असलेल्या डिजिटल मीडिया मधील संपादक पत्रकारांना याचा लाभ होणार आहे. तत्कालिन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत आश्वासनही दिले होते. या आश्वासनानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुद्धा महायुतीच्या सर्व नेत्यांनी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे अभिनंदन केले असून, लवकरच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील त्या त्या मंत्र्याचा सत्कार महाराष्ट्र पत्रकार परिषद करणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना याचा लाभ होणार असून संघटनांनी केलेल्या योग्य पाठपुरावामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासात हा निर्णय म्हणजे क्रांतिकारक निर्णय आहे.