yuva MAharashtra नवा शैक्षणिक टप्पा, नव्या स्वप्नांसोबत... आणि शाळेच्या उंबरठ्यावरच ज्ञानाचा पहिला संच हातात

नवा शैक्षणिक टप्पा, नव्या स्वप्नांसोबत... आणि शाळेच्या उंबरठ्यावरच ज्ञानाचा पहिला संच हातात


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - गुरुवार दि. ५ जून २०२५

नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी मिरज तालुक्यातील शाळांमध्ये एक सुंदर चित्र पाहायला मिळत आहे – विद्यार्थ्यांच्या हाती शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे संच दिले जात आहेत.

तालुक्यातील चौदा केंद्रांतील शाळांसाठी आवश्यक असलेली पुस्तके केंद्र शाळांमध्ये पोहोचवण्यात आली असून, त्याचे सुयोग्य नियोजन पंचायत समिती मिरज व समग्र शिक्षण विभागाच्या सहकार्याने करण्यात आले आहे. खटाव, आरग, नांद्रे, कवलापूर, एरंडोली, खंडेराजुरी, सोनी, माधवनगर, कुपवाड, कसबेडिग्रज, कवठेपिरान, म्हैसाळ, बेडग व मालगाव या केंद्रांवर 3 ते 11 जूनदरम्यान वेळापत्रकानुसार पुस्तकांचे वितरण होणार आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण 29,666 विद्यार्थ्यांना वेळेवर पाठ्यपुस्तके मिळावीत, यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा, खासगी हायस्कूल्सचे शिक्षक व मुख्याध्यापक स्वतः मिरज येथे येऊन पुस्तकांची ने-आण करत आहेत.

माध्यमानुसार पुस्तकांचे वितरण:

मराठी माध्यम:
पहिली ते आठवीसाठी विषय व वर्गानुसार एकूण 29,666 संच उपलब्ध.
उदा. पहिली – 3369, चौथी – 3832, आठवी – 4069 संच.

उर्दू माध्यम:
पहिली – 74 ते आठवी – 10 संच, वर्गनिहाय वाटप.

सेमी इंग्रजी:
पहिली – 425, पाचवी – 1450, आठवी – 1340 संच.

विशेषतः, इयत्ता पहिलीसाठी नव्या CBSE पॅटर्ननुसार पुस्तके मिळाल्यामुळे, शिक्षण पद्धतीत आधुनिकता आणि गुणवत्तेचा समावेश होणार आहे.


नियोजनाचे बळकट हात:

गटशिक्षणाधिकारी प्रभारी जहांगीर बागवान, पाठ्यपुस्तक प्रमुख संजय यादव, तसेच समग्र शिक्षेचे सर्व कर्मचाऱ्यांनी – अर्चना साळुंखे, शीतल सुतार, लक्ष्मण शिंदे, सोनाली कुंभार, विद्या शिंदे, कविता वाडीले, निर्मला यादव इत्यादींनी अत्यंत निष्ठेने हे वितरण कार्य हाताळले आहे.